U19 World Cup : बीडच्या सचिन धसचं क्रिकेट खेळणं रुचलं नव्हतं! वडिलांनी सांगितलं नेमकं काय झालं ते…
अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. सुपर सिक्सच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला तारण्यात बीडच्या सचिन धसची महत्त्वाची भूमिका राहिली. त्यामुळे सर्वत्र त्याच्या नावाची चर्चा होत आहे. असं असताना त्याच्या वडिलांनी क्रिकेट करिअरबाबत सिक्रेट सांगितले आहेत.
मुंबई : अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत सुपर सिक्स फेरीत नेपाळ विरुद्ध सचिन धसने दमदार शतक ठोकलं. भारताचे तीन गडी झटपट बाद झाले असताना कर्णधार उदय सहारनसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केली. बीडच्या सचिन धसने ११६ धावांची खेळी केली. तसेच उदय सहारनसोबत चौथ्या गड्यासाठी २१५ धावांची भागीदारी केली. या खेळीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तेव्हा त्याने ही शतकी खेळी वडिलांना बर्थडे गिफ्ट असल्याचं सांगितलं होतं. सचिन धस आणि वडिलांचा बर्थडे मागेपुढे आहे. २ फेब्रुवारीला शतक ठोकलं तेव्हा वडिलांचा बर्थडे होता. तर ३ फेब्रुवारीला खुद्द सचिनचा वाढदिवस आहे. आता बर्थडे गिफ्टवर सचिनचे वडील संजय धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्यांनी आपल्याा भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.
“मी आता आता ५१ वर्षांचा झालो आहे. तर आज सचिनचा १९ वा वाढदिवस आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास क्षण आहे. माझ्या मुलाने माझ्या वाढदिवशी शतक ठोकलं आहे. त्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे. शनिवारी सचिन आणि माझा वाढदिवस साजरा करेल.”, असं सचिनचे वडील संजय धस यांनी सांगितलं. संजय धस हे महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात नोकरी करत आहेत.
मुलाचं नाव सचिन ठेवण्यामागचा हेतूही त्यांनी यावेळी सांगितला. “मी सुनील गावस्कर यांचा खूप मोठा चाहता आहे. पण मी माझ्या मुलाचं नाव सचिन ठेवलं आहे. माझी इच्छा होती की माझा मुलगा मोठा होऊन क्रिकेटपटू बनावा आणि नावलौकिक मिळवावं. आजची पिढी सुनील गावस्कर यांना तितकं ओळखत नाही. पण सचिनला प्रत्येक जण ओळखतो. माझा मुलगा यासाठी १० नंबरची जर्सी परिधान करतो. कारण तो सचिनचा चाहता आहे.”, असंही संजय धस यांनी सांगितलं.
“सचिनला लहानपणापासूनच क्रिकेटपटू व्हायचं होतं. पण माझ्या पत्नीचा त्याला विरोध होता. पण राज्य स्तरावर सचिनचा खेळ पाहिल्यावर तिचं मन बदललं.” असंही संजय धस यांनी सांगितलं. संजय धस कॉलेज जीवनात क्रिकेट खेळायचे. तर सचिनची आई एथलीट होती आणि राज्यस्तरीय कबड्डी खेळली आहे. सध्या सुरेखा धस या महाराष्ट्र पोलीस दलात असिस्टंटच पोलीस इन्स्पेक्टर आहेत.