USA: यूएसएला Super 8 मध्ये पोहचताच मिळाली गूड न्यूज, सौरभ भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार
USA T20 World Cup: यजमान आणि एकूणच पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत खेळणाऱ्या यूएसएने सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला. यूएसएला यासह एक मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील यूएसए विरुद्ध आयर्लंड यांच्यातील 30 वा सामना हा पावसामुळे ओल्या झालेल्या खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला आहे. सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना समसमान 1-1 गुण देण्यात आला. यूएसएचे यासह एकूण 5 गुण झाले. यूएसएने यासह सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला. ए ग्रुपमधून सुपर 8 मध्ये पोहचणारे टीम इंडिया आणि यूएसए हे 2 संघ ठरले. तर पाकिस्तान, आयर्लंड आणि कॅनडा हे 3 संघ स्पर्धेतून बाहेर झाले.
यूएसएला नवव्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर 8 मध्ये एन्ट्री घेताच सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी मिळाली आहे. अमेरिकेने 2026 साली (दहाव्या) होणाऱ्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत थेट प्रवेश मिळवला आहे. या टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सुपर 8 मध्ये पोहचणाऱ्या संघांना आगामी 2026 च्या आयसीसी स्पर्धेसाठी प्रवेश मिळाला आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतही एकूण 20 संघ खेळणार आहेत. त्यातील 20 पैकी 8 संघांना (यजमान भारतासह) थेट प्रवेश मिळाला आहे. तर त्यानंतर सर्वोत्तम रँकिंग असलेल्या 3 संघांसह यजमान श्रीलंकेचा समावेश होणार आहे.
असं आहे गणित
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या स्पर्धेत थेट प्रवेश मिळवणाऱ्या संघांमध्ये (14 जूनपर्यंत) ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, टीम इंडिया, विंडिज, दक्षिण आफ्रिका आणि यूएसए या 6 संघांचा समावेश झाला आहे. तर आता इंग्लंड आणि बांगलादेशही सुपर 8 मध्ये पोहचताच आपली जागा निश्चित करतील. तसेच इंग्लंड आणि बांगलादेशची संधी हुकली तर नेदरलँड्स आणि स्कॉटलँडला थेट संधी मिळेल. अशाप्रकारे 8 संघ निश्चित होतील.
तर श्रीलंका या टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील साखळी फेरीतूनच बाहेर झाली आहे. मात्र 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये यजमान या नात्याने श्रीलंकेला थेट संधी मिळाली आहे. श्रीलंका अशाप्रकारे नववी टीम ठरेल. तर न्यूझीलंड, पाकिस्तान आणि आयर्लंड/स्कॉटलँड इतर 3 संघ म्हणून सहभागी होतील. या 4 पैकी 3 संघांची निवड ही 30 जून 2024 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या आयसीसी टी 20 रँकिंगच्या आधारे होईल. अशाप्रकारे 20 पैकी 12 संघ निश्चित होतील. तर 8 संघ हे क्वालिफायरद्वारे निश्चित होतील. या 8 संघांमध्ये कॅनडा, झिंबाब्वे, नामिबिया, नेपाळ, पापुआ न्यू गिनी, युगांडा, ओमान आणि आयर्लंडचा समावेश आहे. तर लवकरच आणखी काही संघांची नावं यात जोडली जाणार आहेत. या रिजनल क्वालिफायर स्पर्धेचं आयोजन हे 15 जूनपासून करण्यात आलं आहे.
सौरभ मायदेशात खेळणार!
USA QUALIFIED INTO T20I WORLD CUP 2026 IN INDIA & SRI LANKA..!!!!!
– USA CRICKET 🫡 pic.twitter.com/v0AjZLBgpX
— Johns. (@CricCrazyJohns) June 14, 2024
दरम्यान मुंबईकर असलेल्या सौरभ नेत्रवाळकर याचं वय सध्या हे 32 आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा 2026 साली आहे, तेव्हा सौरभ 34 वर्षांचा असेल. सौरभने तोवर निवृत्ती घेतली नाही, तर तो निश्चितच भारतात अर्थात आपल्या मायदेशात खेळताना दिसेल.
युनायटेड स्टेट्स टीम: आरोन जोन्स (कॅप्टन), शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शेडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावळकर, अली खान, नॉथुश केंजिगे, मोनांक पटेल, निसर्ग पटेल आणि मिलिंद कुमार.