टीम इंडियात जागा न मिळाल्याने या खेळाडूने सोशल मीडियावर काढला राग! क्रिप्टीक पोस्ट होतेय व्हायरल
टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु असातना झिम्बाब्वे विरूद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. असं असताना एका खेळाडूची क्रिप्टीक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु असताना भविष्याच्या दृष्टीने टीमची बांधणी सुरु झाली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यातून या संघाची चाचपणी सुरु होणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया पाच सामन्याची टी2 मालिका खेळणार आहे. या संघात आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या बहुतांश खेळाडूंची निवड केली आहे. पण आयपीएल 2024 स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला डावलण्यात आलं आहे. त्यामुळे त्याने आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा क्रीडाप्रेमी करत आहेत. हा खेळाडू दुसरा तिसरा नसून कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयात योगदान देणारा वरुण चक्रवर्ती आहे. वरुण चक्रवर्तीला टीम इंडियात स्थान मिळालेल नाही. वरुण चक्रवर्तीने 2024 आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू ठरला होता. पण त्याचा विचार संघासाठी केला गेला नाही.
वरुण चक्रवर्तीने टीम इंडियाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर एक क्रिप्टीक पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली आहे. क्रिप्टीक पोस्टचा संदर्भ निवडीशी जोडला जात आहे. संघाची घोषणा झाल्यावरच अशी पोस्ट करण्याचं कारण काय? असा प्रश्नही क्रीडाप्रेमींनी विचारला आहे. वरुण चक्रवर्तीने लिहिलं की, खरंच, माझ्याकडे पेड पीआर एजन्सी हवी होती. त्यानंतर आणखी एका इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं की, देवा मला त्या गोष्टी स्वीकार करण्यासाठी शांती प्रदान कर. ज्या मी बदलू शकत नाही. ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्यासाठी मला शक्ती दे. फरक जाणून घेण्याची बुद्धी दे.
आयपीएल 2024 स्पर्धेत वरुण चक्रवर्ती 15 सामने खेळला वरुण चक्रवर्तीने आयपीएलमध्ये 8.04 च्या इकोनॉमी रेटने एकूण 21 विकेट घेतल्या. टीम इंडियासाठी वरुण चक्रवर्ती 6 टी20 सामने खेळला असून त्यात फक्त 2 विकेट घेतल्या आहेत. वरुण चक्रवर्ती 2021 टी20 वर्ल्डकपमध्ये शेवटचा सामना खेळला होता.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान, खलील कुमार, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.