टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेट खेळण्यास वरुण चक्रवर्तीचा नकार, कारण…
वरुण चक्रवर्तीने चॅम्पियन्स ट्रॉफीत कमाल करत भारताला जेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. टी20 आणि वनडे क्रिकेटमध्ये वरुण चक्रवर्ती चांगली गोलंदाजी करत आहे. आता त्याने कसोटी क्रिकेट खेळावं असा सूर उमटत आहे. पण वरुण चक्रवर्तीने कसोटीत न खेळण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.

वरुण चक्रवर्तीची मिस्ट्री गोलंदाज म्हणून आता ख्याती आहे. प्रत्येक जण त्याच्या शैलीचा फलंदाजी करताना अभ्यास करत आहे. मात्र कधी कोणता चेंडू कसा येईल याचा अंदाज काही येत नाही. त्यामुळे टीम इंडियासाठी वरुण चक्रवर्ती मोक्याच्या क्षणी हुकूमाचा एक्का ठरत आहे.चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत वरुण चक्रवर्तीची अचानक संघात वर्णी लागली. त्याला संघात घेतल्याने अनेकांनी नाकही मुरडली. पण वरुण चक्रवर्तीने या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करून दाखवलं. तसेच आपल्या कामगिरीने विरोधकांची तोंड बंद केली. आता त्याने कसोटी क्रिकेट खेळावं अशी मागणी होत आहे. नवजोत सिंह सिद्धूने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वरुणची निवड संघात व्हावी असा सल्ला दिला आहे. कारण मिस्ट्री फिरकी इंग्लंडच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी आहे. त्यामुळे भारताला विजय मिळवणं सोपं होईल. पण वरुण चक्रवर्ती सध्या कसोटी क्रिकेट खेळण्यास तयार नाही. तसेच कसोटी क्रिकेटपासून लांब राहणं पसंत केलं आहे. त्या मागचं कारणही त्याने सांगितलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर मायदेशी परतल्यानंतर वरुण चक्रवर्तीने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्याला कसोटी खेळण्याबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा वरुण चक्रवर्तीने त्याचं उत्तर देताना सांगितलं की, सध्या मी 20 आणि 50 षटकाच्या क्रिकेटवर फोकस करत आहे. कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. पण वरुणच्या मते, त्याची गोलंदाजी शैली कसोटी क्रिकेटला सूट करत नाही. मोठे स्पेल टाकू शकत नाही. यामुळेच कसोटी क्रिकेटपासून लांब असल्याचं त्याने सांगितलं. वरुण चक्रवर्तीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील 3 सामन्यात 9 विकेट घेतल्या. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर राहिला.
वरुण चक्रवर्तीने सांगितलं की, ‘मला कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. पण माझी गोलंदाजीची शैली कसोटी क्रिकेट सूट करणार नाही. खरं सांगायचं तर माझी गोलंदाजी शैली आणि या शैलीसह कसोटीत लांब स्पेल टाकणं शक्य नाही.’ वरुण चक्रवर्तीने असं स्पष्टीकरण दिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं. वरुण चक्रवर्तीला त्याच्या गोलंदाजीचा अंदाज आहे ही कौतुकास्पद बाब आहे. दुसरीकडे, वरुण चक्रवर्ती आता आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीची जादू दाखवण्यास सज्ज झाला आहे. वरुण चक्रवर्तीने मागच्या पर्वात जबरदस्त गोलंदाजी केली होती. यासाठी कोलकाता नाइट रायडर्स फ्रेंचायझीने त्याला रिटेन केलं आहे.