Cricket : शतकांवर शतक, भारतीय फंलदाजांचा धमाका, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दावा
टीम इंडियाच्या फलंदाजाने विजय हजारे ट्रॉफीतील या हंगामात धमाका केला आहे. या फलंदाजाने सलग 4 शतकं झळकावली आहेत. तसेच गेल्या 6 सामन्यांमध्ये 5 शतकं केली आहेत.
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा ही 18 किंवा 19 जानेवारीला करण्यात येऊ शकते. त्याआधी टीम इंडियाच्या एका खेळाडूने विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला दावा मजबूत केला आहे. तसेच या खेळाडूने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. या स्पर्धेत फलंदाजाने सलग 4 शतकं झळकावत धमाका केला आहे. या खेळाडूने गेल्या 6 सामन्यांमध्ये 5 शतकं झळकावली आहेत. या खेळाडूने आतापर्यंत टीम इंडियाचं 8 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.
करुण नायर
टीम इंडियाचा फलंदाज करुण नायर याने शतकांची डबल हॅटट्रिक केली आहे. करुण नायर विजय हजारे ट्रॉफीत विदर्भाचं नेतृत्व करत आहे. करुणने राजस्थान विरुद्ध क्वार्टर फायनल सामन्यात शतकी खेळी केली आणि विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. करुणने 82 बॉलमध्ये 13 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 122 धावा केल्या. विदर्भाने यासह राजस्थानवर 9 विकेट्सने दमदार विजय मिळवला.
दुसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी
करुण नायर याने या शतकी खेळीदरम्यान ध्रुव शोरी यासह दुसऱ्या विकेटसाठी 200 धावांची नाबाद भागीदारी केली. विदर्भाने या नाबाद द्विशतकी भागीदारीच्या जोरावर 292 धावांचं आव्हान हे 43.3 ओव्हरमध्ये सहज पूर्ण केलं. ध्रुव यानेही करुणप्रमाणे शतकी खेळी केली. ध्रुवने नाबाद 118 धावा केल्या.
करुणकडून एन जगदीशनच्या विक्रमाची बरोबरी
🚨 Record Alert 🚨
Vidarbha captain Karun Nair has now hit the joint-most 💯s in a season in the #VijayHazareTrophy, equalling N Jagadeesan’s (2022-23) tally of 5 centuries! 😮
📽️ Relive his fantastic knock of 122* vs Rajasthan in quarterfinal 🔥@IDFCFIRSTBank | @karun126 pic.twitter.com/AvLrUyBgKv
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 12, 2025
करुणने विजय हजारे ट्रॉफीतील या हंगामाची सुरुवात शतकाने केली होती. करुणने जम्मू-काश्मिरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 23 डिसेंबर रोजी नाबाद 112 धावा केल्या होत्या. तसेच करुणने दुसऱ्या सामन्यात नाबाद 44 धावा केल्या. त्यानंतर करुणने 163*, 111* आणि आता नाबाद 122 धावा केल्या.
दरम्यान आता विदर्भाने राजस्थानला लोळवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. विदर्भाचा उपांत्य फेरीत महाराष्ट्रविरुद्ध सामना होणार आहे. हा सामना 16 जानेवारीला होणार आहे.