VHT 2024 : मुंबईने नागालँडवर 189 धावांनी मिळवला विजय, आयुष म्हात्रेची आक्रमक फलंदाजी
विजय हजारे ट्रॉफी 2024 स्पर्धेत क गटात मुंबई आणि नागालँड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात मुंबईने 403 धावांचं मोठं आव्हान नागालँडसमोर ठेवलं होतं. मात्र नागालँड हे आव्हान काही गाठता आलं नाही.
विजय हजारे स्पर्धेत मुंबई आणि नागलँड यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल नागालँडच्या बाजूने लागला. नागालँडने प्रथम गोलंदाजी निवडली आणि निर्णय फसला. मुंबईने 50 षटकात 7 गडी गमवून 403 धावा केल्या आणि विजयासाठी 404 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही नागालँडला गाठता आलं नाही. नागालँडने 50 षटक पूर्ण खेळत 9 गडी गमवून 214 धावा केल्या. मुंबईने नागालँडवर 189 धावांनी विजय मिळवला. मुंबईने क गटात एकूण 5 सामने खेळले असून 3 सामन्यात विजय आणि 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. 12 गुण असून क गटातील गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबई पहिल्या षटकापासून नागालँडच्या संघावर तुटून पडली. अंगकृष रघुवंशी आणि आयुष म्हात्रे या जोडीने सळो की पळो करून सोडलं. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 156 धावांची भागीदारी केली. या सामन्यात आयुष म्हात्रेचा तडका नागालँडच्या गोलंदाजांना चांगलाच महागात पडला. 17 वर्षीय आयुष म्हात्रेने नागालँडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. आयुष म्हात्रेने 117 चेंडूंचा सामना केला आणि 181 धावा केल्या.
आयुष म्हात्रेचं द्विशतक फक्त 19 धावांनी हुकलं. त्याने 154 हून अधिकच्या स्ट्राईक रेटने 181 धावा केल्या. या खेळीत त्याने 11 षटकार आणि 15 चौकार मारले. 17 वर्षीय आयुषचं लिस्ट ए करिअरमधील हे पहिलं शतक आहे. अंगकृष रघुवंशीने 66 चेंडूत 56 धावा केल्या. तर शार्दुल ठाकुरने तळाशी येत 28 चेंडूतच 73 धावा ठोकल्या. 260 च्या स्ट्राईक रेटने ही धुलाई केली. यात 8 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. शार्दुल ठाकुरने गोलंदाजीतही कमाल केली. त्याने 5 षटकं टाकली. यात एक निर्धाव षटक टाकलं आणि 17 धावा देत 3 गडी बाद केले.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
नागालँड (प्लेइंग इलेव्हन): सेदेझाली रुपेरो, देगा निश्चल, चेतन बिस्ट (विकेटकीपर), रोंगसेन जोनाथन (कर्णधार), युगंधर सिंग, जगदीशा सुचिथ, हेम छेत्री, नागहो चिशी, इम्लिवाती लेमतूर, तहमीद रहमान, दीप बोराह.
मुंबई (प्लेइंग इलेव्हन): आंगकृष्ण रघुवंशी, आयुष म्हात्रे, प्रसाद पवार (विकेटकीपर), सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, अथर्व अंकोलेकर, शार्दुल ठाकूर (कर्णधार), हिमांशू सिंग, रॉयस्टन डायस, जय गोकुळ बिस्ता, हर्ष तन्ना