Vinod Kambli-Sachin Tendulkar यांच्या मैत्रीत या कारणामुळे पडला मिठाचा खडा!
सचिन तेंडुलकर याचा लहानपणीचा मित्र आणि टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. दोघेही खास मित्र होते आणि आहेत. मात्र या दोघांमध्ये मधल्या काही काळात दुरावा निर्माण झाला होता. कशामुळे आणि का? काय होतं कारण? जाणून घ्या.
सर रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाच्या अनावरणानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सचिन तेंडुलकरचा लहानपणीचा मित्र विनोद कांबळी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कांबळी चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे त्याची प्रकृती. कांबळीला या जाहीर कार्यक्रमात सचिनला इच्छा असतानाही त्याला मिठी मारता आली नव्हती. तसेच रमाकांत आचरेकर सरांच्या आठवणीत गाणं गातानाही कांबळी अडखळत होता. कांबळी आणि तेंडुलकर दोघेही जीवश्च कंठश्च असे होते. दोघांनीही आचरेकर सरांच्या मार्गदर्शनात क्रिकेटचे धडे गिरवले आणि टीम इंडियाचं प्रतिनिधित्वही केलं. मात्र सचिन फार पुढे गेला. तर कांबळीने नको त्या सवयींना जवळ केलं आणि क्रिकेटपासून दूर गेला. तसंच गेल्या काही काळात सचिन आणि कांबळी यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. दोघांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला होता. या दोघांमध्ये दुरावा का निर्माण झाला होता? याबाबत या दोन्ही दिग्गज क्रिकेटपटूंचा सहकारी राहिलेल्या संजय मांजरेकर याने खुलासा केला.
संजय माजंरकेरने 3 वर्षांपूर्वी मोठा खुलासा केला होता. कांबळी वांरवार सचिनवर टीका करुन त्याला त्रास द्यायचा असं मांजरेकरने म्हटलं होतं. कांबळी, तेंडुलकर प्रमाणे संजय मांजरेकरही मुंबईकर आहे. तिघांनी एकत्रच टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. संजय मांजरेकरने 3 वर्षांपूर्वी स्पोर्ट्सकीडाला मुलाखत दिली होती. मांजरेकरने या मुलाखतीत तेंडुलकर आणि कांबळीबाबत मोठा खुलासा केला होता. कांबळीला सचिनची बॅटिंग आवडायची नाही. कांबळी सचिनवर कायम टीका करायचा, ज्यामुळे शांत स्वभावाचा सचिन वैतागायचा, असं मांजरेकरने म्हटलं होतं.
मांजरेकरने 1992 च्या वर्ल्ड कपचा एक किस्सा सांगितला. कांबळीचा 1992 चा पहिला वर्ल्ड कप होता. कांबळीला अनुभव नसल्याने संधी मिळत नव्हती. तर सचिन प्रत्येक सामन्यात खेळत होता. तेव्हा कांबळी प्रत्येक सामन्यानंतर सचिन जवळ जात त्याच्या बॅटिंगबाबत टीका करायचा आणि वेगाने खेळायचा सल्ला द्यायचा, असं माजंरेकरने म्हटंल.
झिंबाब्वेविरुद्धच्या विजयानंतर दोघेही जवळ आले. तेव्हा सचिन आणि माजंरेकर दोघांनीही अप्रतिम खेळी केली होती. मात्र यानंतरही सामना आणखी लवकर जिंकता आला असता, असं कांबळीने म्हटलं होतं. साधारण गोलंदाजांसमोर चौकार षटकार ठोकायला पाहिजे होते, असं कांबळीने सचिनला म्हटल होतं. त्यानंतर कांबळीला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली. कांबळीने त्या सामन्यात 41 बॉलमध्ये 24 धावा केल्या होत्या. तेव्हा सचिनने कांबळीला प्रश्न केला होता.
मैत्रीत दुरावा कशामुळे?
कांबळी एका रियालिटी शोमधून सचिनने माझ्या वाईट वेळेत मदत न केल्याचा आरोप केला होता. यामुळे दोघांच्या मैत्रीवर मोठा परिणाम झाला आहे. सचिनला ही बाब जिव्हारी लागली. त्यामुळे दोघांमध्ये बोलणं बंद झालं होतं. दोघांमध्ये अनेक वर्ष ना भेट झाली ना काही बोलणं. सचिनने त्याच्या निवृत्तीच्या भाषणातही कांबळीचा उल्लेख केला नव्हता.