विनोद कांबळीला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, 18 क्रमांकाची जर्सी घातली; पण… पाहा Video
क्रिकेटविश्वात गेल्या काही दिवसांपासून विनोद कांबळी हा चर्चेचा विषय ठरला आहे. मागच्या काही दिवसांपासून त्याच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. आता त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. या संदर्भात त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ठाण्याच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मूत्रपिंडाचा त्रास आणि मेंदूत रक्ताच्या गुठल्या झाल्याने त्याची प्रकृती खालावली होती. त्याच्यावर ठाण्याच्या रुग्णालयात योग्य ते उपचार करण्यात आले आणि नववर्षाच्या पहिल्याच तारखेला डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडल्याचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत विनोद कांबळीला नीट चालता येत नसल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्याचा हात पकडून त्याला गाडीत कसं बसं बसवल्याचं व्हिडीओत दिसत आहे. गाडीत बसल्यानंतर त्याने हसत सर्वांचे आभार मानले. इतकंच काय नववर्षाच्या शुभेच्छा देताना कांबळीने सांगितलं की, नागरिकांनी दारू आणि अन्य नशा करण्यापासून दूर राहिलं पाहीजे. विनोद कांबळीने सांगितलं की, ‘कोणतंही व्यसन तुमचं आयुष्य नष्ट करू शकते.’ तसेच लवकरच मैदानात उतरणार असल्याचं त्याने सांगितलं.
विनोद कांबळीला डिस्चार्ज मिळाला तेव्हा त्याने टीम इंडियाची जर्सी परिधान केली होती. तसेच सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्या जर्सीवर 18 हा क्रमांक लिहिलेला आहे. सध्या भारतीय संघात खेळणाऱ्या विराट कोहलीचा जर्सी नंबर 18 आहे. पण एक काळ विनोद कांबळी या जर्सी नंबरसह मैदानात उतरायचा. पण आता ही जर्सी घालून त्याला नीट चालता देखील येत नाही, इतकी तब्येत खालावली आहे. विनोद कांबळी भारतासाठी वनडे आणि टेस्ट सामने खेळला आहे. टीम इंडियासाठी 1991 मध्ये वनडेत डेब्यू केलं होतं. तर शेवटचा वनडे सामना 2000 साली खेळला होता. विनोद कांबळीन कसोटीत सर्वात वेगाने 1000 धावांचा पल्ला गाठला होता. तसेच कमी वयात द्विशतक ठोकत प्रसिद्धी मिळवली होती. पण नंतर त्याचा फॉर्म घसरला आणि कमबॅक करणं कठीण झालं.
पूर्व भारतीय क्रिकेटर विनोद कांबली को दस दिन के इलाज के बाद अस्पताल से मिली छुट्टी#VinodKambli pic.twitter.com/GXhnPubZJN
— Raajeev Chopra (@Raajeev_Chopra) January 1, 2025
विनोद कांबळीची तब्येत डिसेंबर 2024 मध्ये अचानक बिघडली होती. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागलं. इतकंच काय तर रुग्णालयाने त्याची आर्थिक स्थिती पाहून मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला. विनोद कांबळीला डिस्चार्ज दिला असला तरी त्याची प्रकृती ठीक नसल्याचं दिसत आहे. विनोद कांबळीने येत्या काळात त्याच्या तब्येतीची काळजी घेणं आवश्यक असल्याचं क्रीडाप्रेमी सांगत आहेत.