मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची (Vinod Kambli) आर्थिक स्थिती (Financial condition) सध्या चांगली नाहीय. त्याने अलीकडेच एका मुलाखतीत सध्या त्याच्याकडे काम नसल्याचं म्हटलं होतं. कुटुंबाचा डोलारा चालवण सोपं नाहीय. सध्या आपल्याला फक्त दर महिन्याला BCCI कडून मिळणाऱ्या पेन्शनचा आधार असल्याच सांगितलं होतं. विनोद कांबळी आता 50 वर्षांचा आहे. 2019 मध्ये त्याने टी 20 मुंबई लीग स्पर्धेत शेवटचा कोचिंगचा जॉब केला होता. त्यानंतर कोरोनामुळे सगळच कोलमडलं. विनोद कांबळीची ही अडचण लक्षात घेऊन, आता महाराष्ट्रातील एक उद्योगपती (Businessman) पुढे आले आहेत. संदीप थोरात असं त्यांच नाव आहे. उद्योजक संदीप थोरात यांनी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला नोकरीची ऑफर दिली आहे. मुंबईतल्या सह्याद्री उद्योगसमूहाच्या फायनान्स कंपनीत एक लाख रुपये पगाराची ऑफर त्यांनी दिली आहे.
“महाराष्ट्रात खूप चांगले व्यक्ती आहेत, मात्र त्यांच्यावर ही वेळ का येते? हेच कळलं नाही, असं संदीप थोरात म्हणाले. विनोद कांबळी यांनी क्रिकेट मध्ये भारताचे नाव एका विशिष्ट उंचीवर नेऊन पोहोचवलं. मात्र आज कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी ओढाताण करावे लागत असेल हे आपलं अपयश आहे” असं ते म्हणाले.
विनोद कांबळी नेरुळ येथील तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादामी मध्ये युवा क्रिकेटपटुंना मार्गदर्शन करायचा. पण नेरुळ पर्यंतचा प्रवास खूप लांब पडायचा म्हणून त्याने ते बंद केलं. “मी सकाळी 5 वाजता उठायचो. टॅक्सी पकडून डी.वाय.पाटील स्टेडियम मध्ये जायचो. खूप दगदग व्हायची. त्यानंतर मी संध्याकाळी बीकेसी ग्राऊंड मध्ये कोचिंग सुरु केली” असं कांबळीने मिड डे ला सांगितलं. “मी निवृत्त क्रिकेटपटू आहे. पूर्णपणे बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनवर अवलंबून आहे. बोर्डाक़डून मिळणारे पैसे हेच एकमेव माझ्या उत्त्पन्नाच साधन आहे. त्यासाठी मी खरोखर त्यांचा आभारी आहे. त्यामुळे मला कुटुंब चालवता येतय” असं कांबळी म्हणाला.
बालपणीचा मित्र आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला तुझी आर्थिक स्थिती माहित आहे का? या प्रश्नावर कांबळी म्हणाला की, “सचिनला सगळं काही माहित आहे. पण मला त्याच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही. त्याने मला तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादामी काम दिलं होतं. त्याचा मला आनंद आहे. तो चांगला मित्र आहे. माझ्या पाठिशी तो नेहमीच उभा आहे”