विनोद कांबळीचा सौरव गांगुलीच्या नेतृत्वात ठरला शेवटचा सामना, असं काय झालं की पुन्हा संधीच मिळाली नाही
विनोद कांबळी हे भारतीय क्रिकेटमधील एकेकाळी गाजलेलं नाव.. पण 2000 साली त्याच्या क्रिकेट कारकिर्दिचा शेवट झाला. सचिन तेंडुलकर आणखी 13 वर्षे खेळला. मग विनोद कांबळीसोबत शेवटच्या सामन्यात काय झालं? जाणून घ्या.
मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये दिवंगत रमाकांत आचरेकर सरांचा पुतळा त्यांनी घडवलेल्या क्रिकेटपटूंच्या उपस्थितीत पार पडला. रमाकांत आचरेकरांचे सर्वात आवडते शिष्य म्हणून सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीकडे पाहीलं जातं. पण क्रिकेटच्या पटलावर सचिन पुढे निघून गेला. तर विनोद कांबळीची गाडी पाठी सुटली. विनोद कांबळीने भारतीय क्रिकेटचा एक काळ गाजवला होता. सचिन तेंडुलकर इतकाच त्याच्या खेळाचा नावलौकीक होता. पण 1996 वनडे वर्ल्डकपपासून त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला उतरती कळा लागली. त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही असं नाही. त्याला संधी मिळाली पण त्याला त्या संधीचं सोनं करता आलं नाही. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात विनोद कांबळी शेवटचा सामना खेळला. हा सामना त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट ठरला. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात नवी टीम उभारी घेत होती. पण विनोद कांबळीला या संघात स्थान मिळवता आलं नाही. यासाठी श्रीलंकेविरुद्धचा सामना कारणीभूत ठरला. कारण भारतीय संघ मोठ्या फरकाने हा वनडे सामना हरला होता. तसेच विनोद कांबळीला काही खास करता आलं नाही.
कोका कोला कपचं आयोजन शारजाहमध्ये करण्यात आलं होतं. या स्पर्धेत भारत, श्रीलंका आणि झिम्बाब्वे हे तीन संघ होते. ही मालिका विनोद कांबळीसाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाची होती. कारण या मालिकेनंतर विनोद कांबळी पुढे खेळणार की नाही हे ठरणार होतं. मालिकेतील पहिला समना भारत श्रीलंका यांच्यात झाला.भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात सचिन तेंडुलकरने 101 धावा केल्या.तर विनोद कांबळी 12 धावांवर असताना रनआऊट झाला.या सामन्यात भारताने 8 गडी गमवून 224 धावा केल्या. तर श्रीलंकेने हे आव्हान 5 गडी गमवून पूर्ण केलं.
भारताचा दुसरा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होता. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत झिम्बाब्वेने पहिली गोलंदाजी स्वीकारली. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर या सामन्यात बॅटिंग ऑर्डर बदलली. विनोद कांबळीला तिसऱ्या स्थानावर संधी दिली गेली. तर कर्णधार सौरव गांगुली चौथ्या स्थानावर आला. विनोद कांबळीने 26 चेंडूत 18 केल्या. यात दोन चौकार मारले. भारताने 50 षटकात 265 धावा केल्या. पण झिम्बाब्वेने विजयासाठी चांगली झुंज दिली आणि फक्त 13 धावांनी सामना गमावला.
तिसरा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होता. भारताने प्रथम गोलंदाजी निवडली. तसेच झिम्बाब्वेला 218 धावांवर रोखलं. ही धावसंख्या भारताने 7 गडी गमवून 48.3 षटकात पूर्ण केली. खरं तर भारताच्या हातून हा सामना गेला होता. पण विनोद कांबळीच्या खेळीच्या जोरावर विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार सौरव गांगुली आणि विनोद कांबळी यांनी जबरदस्त खेळी केली. सौरव गांगुलीने 66 तर विनोद कांबळीने 76 चेंडूत 60 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याचा स्ट्राईक रेट हा 78.94 चा होता.
चौथ्या सामन्यात श्रीलंका समोर होती. मग काय भारतीय गोलंदाजांची दाणादाण उडवून दिली. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकला. श्रीलंकेने 50 षटकात 294 धावा केल्या. पण भारताने 226 धावा करता करता आल्या. भारताचा 68 धावांनी पराभव झाला. विनोद कांबळीला या सामन्यात फक्त 10 धावा करता आल्या. मुरलीधरनने त्याची विकेट काढली.
कोका कोला मालिकेतील अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात रंगला. हा सामना विनोद कांबळीच्या क्रिकेट कारकिर्दिचा शेवट ठरला. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि भारतीय गोलंदाजांची पिसं काढली. जयसूर्याने 161 चेंडूत 189 धावा केल्या. 50 षटकात 299 धावा केल्या आणि 300 धावांचं आव्हान ठेवलं. भारतीय संघ फक्त 54 धावा करू शकला. भारताचा 245 धावांनी दारूण पराभव झाला. हा सामना विनोद कांबळीसाठी शेवटचा ठरला. 15 चेंडूचा सामना करून फक्त 9 धावा करता आल्या होत्या. यानंतर विनोद कांबळीला संधीच मिळाली नाही.