Gautam Gambhir : “टी20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माला बॅटर फक्त म्हणून घेऊ नका, कोहली..” गौतम गंभीरने स्पष्टच सांगितलं
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर आता हळूहळू गाडी रुळावर यायला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाच्या भविष्याबाबत आजी माजी खेळाडू स्पष्टपणे आपलं मत मांडू लागले आहेत. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने टी20 वर्ल्डकप 2024 बाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. कोण कर्णधार असावं आणि का? याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेनंतर आता टीम इंडियाला टी20 वर्ल्डकप 2024 चे वेध लागले आहेत. आयसीसी चषकाचा दुष्काळ संपण्यासाठी आणखी एक संधी चालून आली आहे. पण त्यासाठी आतापासून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. असं असताना रोहित शर्मा टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. पण माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने टी20 वर्ल्डकपबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांनी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळावं असं मत त्याने मांडलं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा पुढच्या वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि युनाइटेड स्टेट ऑफ अमेरिकेत होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने सलग दहा सामने जिंकत अंतिम फेरी गाठली होती. पण अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 6 गडी राखून पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. भारताचा पराभव झाला असला तरी रोहित शर्माच्या नेतृत्वाचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या निस्वार्थी नेतृत्वाची क्रीडाविश्वात चर्चा रंगली आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली टी20 वर्ल्डकप 2022 उपांत्य फेरीचा शेवटचा सामना खेळले होते. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही खेळाडूंनी एकही टी20 सामना खेळला नाही. त्यामुळे टी20 क्रिकेट संघाचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपण्यात आलं आहे. पण बीसीसीआयने अधिकृतरित्या कोणतीही धुरा सोपवलेली नाही. तसेच रोहित शर्मा टी20 खेळणार नसल्याचंही सांगितलेलं नाही.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची कामगिरी पाहून त्यांना टी20 वर्ल्डकपमध्ये स्थान मिळावं अशी चर्चा रंगली आहे. रोहित शर्माची बेधडक फलंदाजीचं कौतुक होत आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप संघाचं नेतृत्व रोहित शर्मा याच्याकडे द्यावं अशी चर्चा रंगली आहे. टी20 वर्ल्डकपसाठी फक्त सहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे.
‘रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना टी20 वर्ल्डकप संघात घेतलं पाहीजे. यात काही दुमत नाही. मला रोहित शर्माला टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करताना पाहायचं आहे. हार्दिक पांड्या ऐवजी माझी पसंती रोहित शर्माला असेल. त्यामुळे टी20 वर्ल्डकपमध्ये रोहितला फक्त बॅटर म्हणून घेऊ नका. विराट कोहलीली देखील टी20 वर्ल्डकप संघात संधी मिळाली पाहीजे.’, असं गौतम गंभीर म्हणाला.
दुसरीकडे वसीम अक्रम यानेही विराट आणि रोहित टी20 वर्ल्डकप संघात असायला हवे असं मत मांडलं आहे. ‘टी20 वर्ल्डकपसाठी अवघे सहा महिने शिल्लक आहेत. मी तर संघात विराट आणि रोहितला नक्की घेईल. ते महत्त्वाचे खेळाडू आहेत. त्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. तरूण खेळाडूंच्या भरवश्यावर टीम उभारू शकत नाहीत’, असं वसीम अक्रम म्हणाला.