IND vs SA | ‘माझ्या हिरोच्या विक्रमाची बरोबरी करणं माझ्यासाठी…’; सचिनच्या विक्रमाशी बरोबरीनंतर विराट भावनिक
Virat Kohli on Sachin Tendulkar : भारत आणि दक्षिण आफ्रिकेा यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये विराट कोहलीने विक्रमी शतक केलं. सचिनच्या सर्वाधिक शतकांची बरोबरी केली, सामना संपल्यानंतर विराट कोहलीने भावनिक प्रतिक्रिया दिली.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने 243 धावांनी विजय मिळवला आहे. भारताच्या 327 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 83 धावांवर ऑल आऊट झाला. या सामन्यामध्ये विजय मिळवत भारताने सलग आठवा विजय मिळवला आहे. या सामन्यात बर्थ डे बॉय विराट कोहली याने सचिन तेंडुलकर याच्या वन डे मधील सर्वाधिक शतकांच्या विक्रमांची बरोबरी साधली आहे. सामना संपल्यानंतर यावर बोलताना विराट कोहली भावनिक झालेला दिसला.
काय म्हणाला विराट कोहली?
दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कपमधील सर्वात तगडा संघ असल्याने हा एक मोठा सामना होता. वाढदिवस असल्याने माझ्यासाठी हा सामना खास होता. मी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतो, गेल्या काही वर्षांमध्ये जे काही केलं त्याचा मला आनंद आहे. माझ्या हिरोच्या विक्रमासोबत बरोबरी करणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी हा भावनिक क्षण असून मला माहित आहे लहानपणी मी त्याला टीव्हीवर पाहिलं आहे. त्यामुळे त्याच्याकडून कौतुक होणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचं विराट कोहली याने म्हटलं आहे.
सचिन तेंडुलकरनेही विराट कोहली याचं कौतुक करत त्याला लवकरच 50 शतकांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहलीने आज सचिनच्या विक्रमाची बरोबरी करण्यासोबतच आपल्या वाढदिवसादिवशी शतक करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांनी शतके केली आहेत. विराटने वन डे क्रिकेटमध्ये भारतात खेळताना 6 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान विश्वचषकात आतापर्यंत सहा सामने झाले आहेत. यावेळी भारत आणि दक्षिण आफ्रिकेने हे सामने 3-3 ने जिंकले आहेत. वनडेमध्ये दोन्ही संघांमध्ये 91 सामने खेळले गेले आहेत. त्यात भारताने 38 तर दक्षिण आफ्रिकेने 50 सामने जिंकले आहेत. तर तीन सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (WK), टेम्बा बावुमा (C), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी