IND vs SA : विराटने 2011 ला दिलेला शब्द केला पूर्ण, नेमकं काय म्हणालेला?
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात विराटने शतकी खेळी करत सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली. सोशल मीडियावर 2011 साली विराटने केलेलं वक्तव्य व्हायरल होत आहे.
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात बाहुबली संघ असलेल्य भारताने 243 धावांनी विजय मिळवला. भारताला आफ्रिका कडवं आव्हान देईल असं सर्वांना वाटलं होतं, मात्र तसं काही झालं नाही. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करताना 326 धावांच डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या शिलेदारांनी आफ्रिकेला 85 धावांवर गुंडाळलं. या सामन्यामध्ये विराट कोहली याने सचिन तेंडुलकर याच्या सर्वाधिक शतकाच्या विक्रमाची बरोबरी केली. यानंतर 2011 साली विराटने सचिन निवृत्त होताना केलेल्या वक्तव्य व्हायरल होत असून त्याने दिलेला शब्द पाळला आहे.
2011 साली भारताने वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं त्यावेळी सचिनला एका युवा स्टार खेळाडूने खांद्यावर घेतलं होतं. आपल्या हिरोला कधी टीव्हीवर पाहणारा हा युवा खेळाडू त्याच्या निवृत्तीवेळी आपल्या खांद्यावर घेत मैदानावर फिरवत होता. तो खेळाडू विराट कोहली होता, त्यावेळी क्रिकेट जाणकारांना पाहणाऱ्यांना कोहली माहित होता. कारण तीन वर्षांआधी पदार्पण केलेला कोहली सर्वांना माहित नव्हता. मात्र आपल्या कामगिरीमुळे आज तो जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वांना माहिती आहे.
सचिनच्या निवृत्तीनंतर कोहलीने दोन शब्द बोलले होते. ते म्हणजे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वात अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. भारताचं नाव क्रिकेट जगतात उंचावलं आहे. सचिनने आतापर्यंत जे काम आपल्या खांद्यावर घेतल होतं, ते काम आता आपल्याला पुढे न्यायचं आहे.
कोहली हे 2011 मध्ये बोलला होता आज 2023 साल असून त्याने बारा वर्षांमध्ये भारतीय संघाच्या फलंदाजीची धुरा लिलया पेलली. सचिनची जागा विराटने पूर्णपणे भरून काढली, इतकंच नाहीतर कोहलीने ती जबाबदारी सांभाळताना संघाला प्रत्येकवेळी संकटातून बाहेर काढत विजयापर्यंत नेलं. आज त्यानेच सचिनच्या वन डे मधील सर्वाधिक शतकांची बरोबरी साधली आहे.
सचिन तेंडुलकरलाही त्याच्या विक्रमाच बरोबरी केल्याचा आनंद झाला. सचिनने त्याला 50 शतक करत लवकरच माझा रेकॉर्ड मोडून इतिहास रचण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने त्याची 49 शतकं 277 डावांमध्ये पूर्ण केली आहेत. भारताचा मॉर्डन मास्टर या वर्ल्ड कपमध्ये सचिनचा विक्रम मोडण्यात यशस्वी ठरतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.