विराट कोहलीने आयपीएल स्पर्धेपूर्वीच दिला होता असा शब्द, यश दयालने केला खुलासा
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी बरंच काही घडताना दिसत आहे. स्पर्धेच्या नियमापासून रिटेन आणि रिलीजबाबत खलबतं सुरु आहेत. त्यामुळे खेळाडूंना आपण आहोत त्या संघात राहणार की नाही हे पण माहिती नाही. असं असताना वेगवान गोलंदाज यश दयालने एक खुलासा केला आहे. आरसीबी संघात येताच विराट कोहलीने दिलेल्या वचनाबाबत सांगितलं.
यश दयाल हे नाव आयपीएल 2023 पासून जास्तच चर्चेत आलं. रिंकु सिंहने शेवटच्या षटकात पाच षटकार मारत स्वत:सह यश दयालही चर्चेच्या पटलावर आणून सोडलं. आयपीएल 2023 स्पर्धा यश दयालसाठी एक वाईट स्वप्न होतं. संपूर्ण मालिकेत चांगली गोलंदाजी करूनही फक्त एका सामन्यावरून त्याचं आकलन केलं गेलं. इतकंच काय तर 2024 आयपीएल स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्सने रिलीज केलं. त्यामुळे त्याला संघात कोण घेणार असा सूर उमटला. पण आरसीबीने यश दयालवर डाव लावला. यश दयालसाठी 5 कोटी मोजून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आता यश दयालने विराट कोहलीच्या एका वचनाबाबत खुलासा केला आहे. यश दयालने स्पोर्ट तकशी बोलताना सांगितलं की, ‘कोहलीने मला सांगितलं होतं की संपूर्ण सिझनमध्ये पाठिंबा देणार. ही माझ्यासाठी मोठी बाब होती. नवीन संघात आला आहेस असं अजिबात वाटणार नाही. इतकंच काय तर त्याने मला पूर्ण सिझनमध्ये पाठिंबा दिला. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला.’
‘विराट कोहली युवा खेळाडूंशी व्यवस्थित बोलतो. त्याच्याबाबत टीव्हीवर ज्या गोष्टी सांगितल्या जातात, तसं काहीच नाही.’ असं यश दयाल पुढे म्हणाला. आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये रिटेंशनची किती आशा आहे, असा प्रश्न यश दयालला विचारला गेला. तेव्हा त्याने सांगितलं की, ‘हा निर्णय मॅनेजमेंटला घ्यायचा आहे.’ जर आरसीबीने रिटेन केलं नाही तर आयपीएलमध्ये कोणत्या संघासाठी खेळायची इच्छा आहे? या प्रश्नावर यश दयालने सांगितलं की, ‘आता तर आरसीबीत आहे. मनापासून आरसीबीसाठी खेळू इच्छितो.’ आयपीएलमध्ये 2022 साली डेब्यू करणाऱ्या यश दयालने आतापर्यंत 28 सामने खेळला आहे.
आयपीएलच्या मागच्या पर्वात यश दयालने चांगली कामगिरी केली होती. 14 सामन्यात 9.14 च्या इकोनॉमी रेटने 15 विकेट घेतल्या. तसेच आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यासाठी मोलाची साथ दिली. सलग सहा सामने गमावल्यानंतर कमबॅकच्या आशा मावळल्या होत्या. पण संघाने आशा सोडली नाही. त्यानंतर सलग सामने जिंकत एलिमिनेटर फेरीत धडक मारली. पण राजस्थानकडून पराभव झाला आणि स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.