IPL 2024 : विराट कोहलीचं इम्पॅक्ट प्लेयर नियमावर बोट, म्हणाला यामुळे सर्वकाही…
आयपीएल स्पर्धेत 2023 पासून इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू आहे. गरजेवेळी अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाजाला मैदानात उतरवता येतं. पण या नियमावर आता विराट कोहलीने टीकास्त्र सोडलं आहे. यापूर्वी रोहित शर्मानेही या नियमावर बोट ठेवलं होतं. विराट कोहलीने नेमकं काय सांगितलं ते जाणून घेऊयात...
विराट कोहली क्रिकेट जगतातील सर्वात मोठा खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. पुढेही तो आपल्या फलंदाजीने क्रीडारसिकांचं मनोरंजन करणार आहे. पण असं सर्व असताना रनमशिन्स विराट कोहलीला एका नियमाचं दु:ख आहे. या नियमामुळे संघाचा समतोल पूर्णपणे बिघडला असल्याचं त्याने मत व्यक्त केलं आहे. हा नियम दुसरा तिसरा कोणता नसून 2023 मध्ये आयपीएलमध्ये लागू झालेला इम्पॅक्ट प्लेयर आहे. विराट कोहलीने जिओ सिनेमाशी बोलताना सांगितलं की, “मी रोहितला पाठिंबा देतो. मनोरंजन एक खेळाचा भाग आहे पण समतोलही असणं तितकंच गरजेचं आहे. या खेळाचा समतोल बिघडला आहे आणि कित्येक जणांना असं वाटत आहे. फक्त मी एकटा नाही.” आयपीएलच्या या सत्रात आठ वेळा 250 च्या पार धावसंख्या गेली आहे. गोलंदाजांचं दु:ख कोहलीला जाणवत आहे.
“आम्ही काय करावं असा प्रश्न गोलंदाजांना पडतो. गोलंदाज प्रत्येक चेंडूवर चौकार-षटकार देतील अशी परिस्थिती मी कधी पाहिली नाही. प्रत्येक संघात बुमराह आणि राशिद खान नसतो. अतिरिक्त फलंदाजामुळे मी पॉवरप्लेमध्ये 200 प्लसच्या स्ट्राईक रेटने खेळत आहे. कारण मला माहिती आहे की आठव्या क्रमांकावरही एक फलंदाज आहे. क्रिकेटमध्ये बॅट आणि बॉलमध्ये समतोल असणं गरजेचं आहे, असं माझं मत आहे.”, असं विराट कोहलीने सांगितलं.
एका सामन्यात दोन भारतीय खेळाडूंना संधी मिळावी म्हणून हा नियम लागू केल्याचं बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितलं होतं. त्यावर विराट कोहली म्हणाला की, “मला खात्री आहे की जयभाई या नियमाचं पुनरावलोकन करतील आणि ठोस आशा निकषापर्यंत पोहोचतील. त्यामुळे खेळात समतोल ठेवता येईल. क्रिकेटमध्ये फक्त चौकार आणि षटकार रोमांचक नसतात. 160 धावा करून विजय मिळवणे देखील रोमांचक आहे.”
क्लब प्रेयर पॉडकास्टवर रोहित शर्माने सांगितलं होतं की, “मी इम्पॅक्ट प्लेयरचा प्रशंसक नाही. काही लोकांच्या मनोरंजनासाठी खेळातून बरंच काही गमवत आहोत. जर या नियमाकडे बारकाईने पाहिलं तर बरीचशी उदाहरणं समोर येतील. वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे सारख्या लोकांना गोलंदाजी करण्याची संधी मिळत नाही. ही बाब आमच्यासाठी चांगली नाही. मला नाही माहिती तुम्ही यासाठी काय करू शकता. पण मी या नियमाचं समर्थन करत नाही हे मी प्रामाणिकपणे सांगतो.”