नवी दिल्ली : आजच्या दिवशीच एकदिवसीय क्रिकेटमधील (Cricket) पहिला सामना विराट कोहली यानं (Virat Kohli) खेळला होता. तो 2008 मध्ये खेळला. श्रीलंका दौऱ्यावर यजमान संघाविरुद्ध डंबुला येथे वनडे (One Day Match) पदार्पण करण्याची संधी त्यावेळी विराटला मिळाली होती. पदार्पणाच्या सामन्यात त्यानं माजी सलामीवीर गौतम गंभीरसह डावाची सुरुवात केली आणि 22 चेंडूत 12 धावा करण्यात यश मिळवले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून चौकार आला. पदार्पणाच्या सामन्यात कोहली श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराचा बळी ठरला. श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजाने त्याला एलबीडब्ल्यू करताना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केल्यापासून त्याने देशासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 262 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटने 253 डावांमध्ये 57.7 च्या सरासरीने 12344 धावा केल्या आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या बाबतीत कोहली सध्या सहाव्या स्थानावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीच्या पुढे फक्त महेला जयवर्धने (12650), सनथ जयसूर्या (13430), रिकी पाँटिंग (13704), कुमार संगकारा (14234) आणि सचिन तेंडुलकर (18426) आहेत.
कोहलीची एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरी सर्वोच्च खेळी विशाखापट्टणम येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली गेली. या सामन्यात त्याने संघासाठी 129 चेंडूत नाबाद 157 धावा काढल्या. यादरम्यान त्यानं 13 चौकार आणि चार उत्कृष्ट षटकार मारले. या सामन्याबद्दल बोलल्यास कोहलीच्या या सुरेख खेळीनंतरही हा सामना बरोबरीत सुटला.
कोहलीची एकदिवसीय क्रिकेटमधील चौथी सर्वोच्च खेळी 23 ऑक्टोबर 2016 रोजी न्यूझीलंडविरुद्ध मोहाली येथे पाहायला मिळाली. या सामन्यात संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 134 चेंडूत नाबाद 154 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमध्ये 16 चौकार आणि एक जबरदस्त षटकार लागला.