IND vs NZ : काय गरज होती? विराट कोहली 200 व्या डावात रन आऊट, व्हीडिओ व्हायरल
Virat Kohli Run Out Video : विराट कोहली याने त्याची विकेट न्यूझीलंडला बोनस म्हणून दिली. टीम इंडिया अडचणीत असताना 1 धावेच्या मोहापायी विराट रन आऊट झाला.
टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळीतील सर्वात निराशाजनक कामगिरी ही न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत केलीय, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. टीम इंडियाने ही 3 सामन्यांची मालिका आधीच गमावली आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने पिछाडीवर आहे. तर तिसऱ्या सामन्यातही काही खास स्थिती नाही. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी न्यूझीलंडला फिरकीच्या जाळ्यात फसवत 235 वर गुंडाळलं. त्यामुळे भारतीय फलंदाजांना चांगली सुरुवात करुन न्यूझीलंडची आघाडी मोडीत काढण्याची संधी होती. मात्र पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय फलंदाजांनी घोर निराशा केली.
कॅप्टन रोहित शर्मा याला चेंडूचा अंदाज न आल्याने तो कॅच आऊट झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरलेला असं वाटत होतं. मात्र यशस्वी रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात बोल्ड झाला. यशस्वीनंतर दुसऱ्याच बॉलवर नाईट वॉचमॅन म्हणून आलेला मोहम्मद सिराज झिरोवर एलबीडबल्यू आऊट झाला. टीम इंडियाने यासह 3 विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर जे झालं ते पाहून क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला.
विराट कोहली स्वत:च्याच कॉलवर रनआऊट झाला.टीम इंडिया आधीच 3 विकेट्स गमावल्याने अडचणीत होती. विराटने मैदानात टिकून राहून खेळण्याची गरज असताना घाई करत आपली विकेट टाकली. विराट 19 व्या ओव्हरमधील तिसर्या बॉलवर फटका मारताच धावत सुटला. मात्र मॅट हॅन्रीने नॉन स्ट्राईक एंडवर अचूक थ्रो करत विराटचा करेक्ट कार्यक्रम केला आणि रन आऊट केलं. विराट 4 धावावंर बाद झाला. विराटची कसोटी क्रिकेटमध्ये रन आऊट होण्याची ही चौथी वेळ ठरली. विशेष म्हणजे विराटचा हा 200 वा डाव होता. त्यामुळे त्याच्याकडून मोठी खेळी अपेक्षित होती. मात्र मोठी खेळी सोडा विराटला परिस्थितीनुसारही खेळता आलं नाही.
दरम्यान टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट्स गमावून 19 ओव्हरमध्ये 86 रन्स केल्या आहेत. त्यामुळे रोहितसेना अजूनही 149 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे आता शुबमन गिल आणि ऋषभ पंत या नाबाद परतलेल्या जोडीवर दुसऱ्या दिवशी मोठी जबाबदारी असणार आहे.
विराट कोहली रन आऊट
Matt Henry’s direct hit catches Virat Kohli short 😯#INDvNZ #IDFCFirstBankTestTrophy #JioCinemaSports pic.twitter.com/cL4RvUdMST
— JioCinema (@JioCinema) November 1, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, इश सोधी, मॅट हेन्री, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.