रोहित शर्मापेक्षा विराट वरचढ? टॉप फलंदाज कोण? जाणून घ्या…
टी-20 विश्वचषकासाठी तयारी सुरू आहे. अनेक देशांनी संघही जाहीर केले आहेत. तर टीम इंडिया देखील सज्ज आहे. दरम्यान, या सगळ्यात विराट कोहली आणि रोहितकडे आशेनं पाहिलं जातंय.
नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) टीम इंडिया (Team India) सुपर फोर फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभूत होऊन बाहेर पडली. या स्पर्धेत टीम इंडियासाठी एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे विराट कोहलीचा (Virat Kohli) फॉर्ममध्ये येणं, हे आहे. कोहलीनं तब्बल साडेतीन वर्षांनी आंतरराष्ट्रीय शतक झळकावलंय. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 (T20) विश्वचषकात भारताला चांगली कामगिरी करायची असेल, तर आघाडीच्या फळीतील दोन सर्वात अनुभवी फलंदाज कर्णधार रोहित आणि कोहली यांना धावा कराव्या लागतील. पण, या दोन्हीमध्ये गेल्या सोळा वर्षांत कोण अव्वल, या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
रोहित शर्मा
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील दोघांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर कोहलीची कामगिरी रोहितवर भारी पडलीय. अधिक सामने खेळल्यामुळे रोहितनं अधिक धावा केल्या असतील. पण कोहलीचा प्रभाव अधिक राहिला आहे. रोहितनं या वर्षी म्हणजे 2022 मध्ये 17 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत. 26.43 च्या माफक सरासरीनं आणि 143.38 च्या स्ट्राइक रेटनं 423 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान रोहित एकदा शून्यावर बाद झाला. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 72 धावा आहे.
विराट कोहली
कोहलीनं 2022 मध्ये केवळ नऊ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 51 च्या प्रभावी सरासरीने आणि 142.80 च्या स्ट्राईक रेटने 357 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. कोहलीही एकदा शून्यावर बाद झाला आहे. आशिया कपमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान हा प्रकार घडला. कोहलीची यंदाची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 122 आहे आणि तो दोनदा नाबाद परतला आहे. म्हणजेच रोहितच्या तुलनेत यंदा कोहलीची कामगिरी सरस ठरली आहे.
2007 मध्ये पदार्पण
रोहितने 2007 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तेव्हापासून त्यानं भारतासाठी 136 T20 सामन्यांमध्ये 32.32 च्या सरासरीने आणि 140.63 च्या स्ट्राइक रेटने 3620 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 4 शतके आणि 28 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 118 धावा आहे.
2021 मध्ये सर्वाधिक 50+ धावा
रोहितही आठ वेळा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शून्यावर बाद झाला आहे. त्याचबरोबर तो 16 वेळा पॅव्हेलियनमध्ये नाबाद परतला आहे. 2007 पासून आत्तापर्यंतच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्यासाठी सर्वोत्तम वर्षाबद्दल बोलताना, रोहितने 2018 आणि 2021 मध्ये सर्वाधिक 50+ धावा केल्या.