“…हा दिवस आम्ही लक्षात ठेवू”, आशिया कप गमावल्यानंतर हरमनप्रीत कौरने व्यक्त केल्या भावना

| Updated on: Jul 28, 2024 | 8:11 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया कप 2024 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने 8 गडी राखून भारताचा पराभव केला. या पराभवामुळे भारतीय क्रीडाप्रेमींचं टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी मनोबल खचलं आहे. पण कर्णधार हरमनप्रीत कौरने केलेल्या चुका सुधारणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

...हा दिवस आम्ही लक्षात ठेवू, आशिया कप गमावल्यानंतर हरमनप्रीत कौरने व्यक्त केल्या भावना
Image Credit source: BCCI
Follow us on

वुमन्स आशिया कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाचा विजयरथ अखेर श्रीलंकेने रोखला. अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताला 8 गडी राखून पराभूत केलं. त्यामुळे टी20 वर्ल्डकपआधी आशिया कप विजयाचं भारताचं स्वप्न भंगलं. या मालिकेतून भारताची टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी झालेली तयारी अधोरेखित होणार होती. पण पराभवामुळे टीम इंडियाला आता आपल्या चुका सुधाराव्या लागणार आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौरने अंतिम सामन्यातील पराभवानंतर संतापही व्यक्त केला आहे. तसेच अंतिम सामन्यात अनेक चुका केल्याचं तिने यावेळी सांगितलं. “आम्ही या स्पर्धेत खूप चांगलं खेळलो यात शंका नाही. पण आजच्या सामन्यात आम्ही खूप चुका केल्या. त्याचा फटका आम्हाला बसला. खरं तर विजयासाठी दिलेली धावसंख्या चांगली होती. आम्ही पॉवर प्लेमध्ये विकेट घेण्याच्या प्रयत्नात होतो. पण तसं काही झालं नाही. श्रीलंकेने खरंच चांगली फलंदाजी केली.” असं कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली. त्यानंतर टी20 वर्ल्डकप स्पर्धेबाबत तिने आपलं मन मोकळं केलं. तसेच हा पराभव लक्षात ठेवू असंही सांगितलं.

” आम्ही टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी काही भागात सुधारणा करू. आम्ही खरंच खूप कठोर मेहनत करू आणि आजचा दिवस लक्षात ठेवू. . ते इतके चांगले क्रिकेट खेळले आहेत. तसेच या संपूर्ण स्पर्धेत ते चांगले क्रिकेट खेळले. ‘ , असंही कर्णधार हरमनप्रीत कौर हीने पुढे सांगितलं. या सामन्यात भारताकडून स्मृती मंधानाने चांगली फलंदाजी केली. तिने 47 चेंडूत 60 धावा केल्या. यात तिने 10 चौकार मारले. तर जेमिमा रॉड्रिग्सने 16 चेंडूत 29 आणि रिचा घोषने 14 चेंडूत 30 धावा केल्या. दुसरीकडे या सामन्यात भारतीय गोलंदाजी पूर्णपणे फेल ठरली.

दीप्ती शर्मा वगळता एकही गोलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. श्रीलंकेने या स्थितीचा बऱ्यापैकी फायदा घेतला. राधा यादव, रेणुका ठाकुर सिंग, तनुजा कंवर, पूजा वस्त्रकार सर्वच फेल ठरले. भाराताने विजयासाठी 165 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान श्रीलंकेने 8 गडी राखून 18.4 षटकात पूर्ण केलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

श्रीलंका महिला (प्लेइंग इलेव्हन): विश्मी गुणरत्ने, चामरी अथापथु (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), हसिनी परेरा, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी, सचीला प्रबोधन.

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, उमा चेत्री, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर, रेणुका ठाकूर सिंग.