टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाला पचका, वेस्ट इंडिजने वाट अडवली
टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या तासांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी मोठ्या उलटफेर होण्याची नांदी मिळत आहे. नेदरलँडने श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर आता वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे या स्पर्धेत कोणत्याही संघाला दुबळं समजणं चांगलंच महागात पडू शकतं.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सहभागी संघ सराव सामने खेळत आहेत. अमेरिका वेस्ट इंडिजमधील वातावरणाचा अंदाज घेत आहेत. मात्र या सराव सामन्यात दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघांनी आपली ताकद दाखवली आहे. त्यामुळे या संघांना हलक्यात घेणं चांगलंच महागात पडू शकतं. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सराव सामना झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड दिला. वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला 35 धावांनी पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिज संघाने दमदार फलंदाजी केली. वेस्ट इंडिजने 20 षटकांत 257 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ फक्त 222 धावाच करू शकला.
वेस्ट इंडिज संघाने 4 गडी गमावून 257 धावा केल्या आणि विजयासाठी 258 धावा दिल्या. निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्यांच्या फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. पूरनने 25 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 75 धावा केल्या, तर रोव्हमन पॉवेलने 52 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ॲडम झाम्पाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
विजयी धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची पडझड सुरु झाली. वॉर्नरकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मात्र 15 धावा करून तंबूत परतला. एस्टन ऑगर 28, तर कर्णधार मिचेल मार्शही 4 धावा करून बाद झाला. जोश इंग्लिशने त्यातल्या त्यात संघाला विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी चांगली खेळी केली. त्यानेत 55 धावा केल्या. पण या व्यतिरिक्त एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. टिम डेव्हिड 25, मॅथ्यू वेड 25, नॅथन एलिसने 39 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफ आणि गुडाकेश मोतीने सर्वाधिक 2 गडी बाद केले.
वेस्ट इंडिजचा साखळी फेरीतील पहिला सामना 2 जून रोजी होणार आहे. वेस्ट इंडिजसमोर पापुआ न्यू गिनी या संघाचं आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 6 जून रोजी होणार आहे. समोर ओमान हा संघ असणार आहे. तसं पाहीलं तर हे दोन्ही या संघांसमोर दुबळे आहेत. पण त्यांना हलक्यात घेणं किती महागात पडू शकतं हे सराव सामन्यात अधोरेखित झालं आहे.