Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युजवेंद्र चहलला असं काय विचारलं की सर्वांनाच आलं हसू
टी20 वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरून टीम इंडिया मायदेशी परतली आहे. यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली. जवळपास दीड तास चर्चेचा फड रंगला. यावेळी काही गंभीर, तर मिश्किल चर्चांना फोडणी दिली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युजवेंद्र चहलला एक प्रश्न विचारला आणि एकच हशा पिकला.
बारबाडोसमध्ये विजयी पताका रोवून टीम इंडिया मायदेशी परतली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना अतितटीचा झाला. कधी सामना दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात तर कधी टीम इंडियाच्या पारड्यात झुकलेला होता. पण शेवटच्या पाच षटकात दक्षिण अफ्रिकेच्या हातात सर्वकाही होतं. मात्र टीम इंडियाने हिम्मत सोडली नाही आणि विजयश्री खेचून आणला. मायदेशी परतलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टी20 वर्ल्डकप पे चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचं यावेळी कौतुक केलं. इतकंच काय तर या खेळाडूंसोबत जवळपास दीड तास चर्चा केली. या चर्चेदरम्यान खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मन मोकळं केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंसोबत काही मजेशीर गप्पाही मारल्या. काम करता करता अंतिम सामन्यावर लक्ष केंद्रीत करणं खूपच कठीण झालं होतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक खेळाडूसोबत अनुभव शेअर केला. अपघात आणि रिकव्हरीनंतर टीम इंडियातील पुनरागमनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषभ पंतचं कौतुक केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा गंभीर होत असताना मधेच फिरकीपटू युजवेंद्र चहल याला गुगली टाकली. मोदींनी चहलची फिरकी घेताना विचारलं की, इतका गंभीर का दिसत आहेस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असा प्रश्न विचारताच सर्वच खेळाडू हसू लागले. यामुळे चहलला लाजल्यासारखं झालं. चहल हा टीम इंडियातील मनमौजी खेळाडू आहे. ड्रेसिंग रुम असो की ड्रिंक दरम्यान पंचांसोबतची त्याची मस्ती चर्चेत असते. त्याच्या मस्तीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असा प्रश्न विचारताच खेळाडूंना हसू आलं.
Our World T20 🏏 Champions enthralled everyone with their outstanding performances. Had a wonderful conversation with them. Do watch! https://t.co/1UPGbCmx6F
— Narendra Modi (@narendramodi) July 5, 2024
टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी 19 नोव्हेंबर 2023 च्या रात्रीची आठवण काढली. टीम इंडियाच्या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी खेळाडूंना भेटायला आले होते. तेव्हा त्यांनी खेळाडूंचं मनोबळ वाढवलं होतं. आता आनंदाच्या क्षणी पुन्हा एकदा पंतप्रधानांना भेटता आलं. दुसरीकडे, रोहित शर्माने पंतप्रधानांना सांगितलं की, विजयाची चव कायम स्मरणात राहावी याासाठी मी खेळपट्टीवरील मातीची चव चाखली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहित शर्माला विचारलं की, 2007 वर्ल्डकप जिंकला तेव्हा संघात खूपच लहान होतास तेव्हाचा काय अनुभव? तेव्हा रोहितने सांगितलं की, ‘तेव्हा मुंबईत जल्लोषात स्वागत झालं होतं. तेव्हा मला वाटलं की वर्ल्डकप जिंकणं सोपं आहे. पण जसा मोठा होत गेलो आणि जेतेपद हुकलं तेव्हा समजलं की हे किती कठीण आहे. यामुळे हा विजय खूप खास आहे.’