केएल राहुल आणि संजीव गोयंका यांच्यात ‘त्या’ दिवशी नेमकं काय बोलणं झालं? अमित मिश्राने केला खुलासा
आयपीएल 2024 स्पर्धेदरम्यान संजीव गोयंका आणि केएल राहुल यांच्यातील संभाषणाची क्लिप खूपच व्हायरल झाली होती. त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं हे कळलं नसलं तरी हावाभावावरून बरंच काही समजून येत होतं. आता अमित मिश्रा याने त्या संभाषणावरील पडदा दूर केला आहे. तेव्हा नेमकं काय बोलणं झालं ते सांगितलं.
आयपीएल 2024 स्पर्धेदरम्यान लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका आणि कर्णधार केएल राहुल यांच्यात वाद झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सनरायझर्स हैदराबादने पराभूत केल्यानंतर संजीव गोयंका यांना राग अनावर झाला असल्याचं तेव्हा सांगण्यात येत होतं. लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 166 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान हैदराबादने फक्त 9.4 षटकात पूर्ण केलं. यामुळे लखनौचं बाद फेरीत जाण्याचं गणित बिघडलं होतं. त्यामुळे संजीव गोयंका यांनी या पराभवानंतर कर्णधार केएल राहुल याला भर मैदानात सुनावल्याचं सांगण्यात येत होतं. आता या वादग्रस्त घटनेबाबत लखनौ सुपर जायंट्सचा फिरकीपटू अमित मिश्रा याने खुलासा केला आहे. केएल राहुल आणि संजीव गोयंका यांच्यात नेमकं काय झालं ते त्याने सांगितलं. अमित मिश्राने सांगितलं की, “गोयंका थोडे निराश होते. मी खोटं बोलणार नाही कारण दोन सामन्यात आम्ही वाईट पद्धतीने हरलो होतो. हैदराबादकडून मिळालेल्या पराभवानंतर आम्ही लाज वाटत होती. मला तर वाटत होती इतरांचं माहिती नाही. मी सरळ ड्रेसिंग रुममध्ये अर्धा तास आधी पॅकअप करून बसलो होतो. मी बोललो चला येथून लवकर.”
“त्या दोघांमध्ये फार काही मोठं बोलणं झालं नाही. पण त्यांनी हे स्पष्ट सांगितलं होतं की, ही काय बॉलिंग होत होती. कमीत कमी फाईट तर करा. आम्ही तर सरेंडरच करून टाकलं. या आणि मारून निघून जा. याला काय अर्थ आहे. काहीतरी प्लानिंगने गोलंदाजी करायला हवी. सामना 14 षटकात संपू द्या किंवा 19व्या किंवा 18व्या..आम्ही याच विकेटवर फलंदाजी केली होती. याच विकेटवर ते फलंदाजी करत होते मग 20 मिनिटात असं काय बदललं?”, असं केएल राहुल आणि संजीव गोयंका यांच्यातील चर्चेबाबत अमित मिश्रा याने सांगितलं.
अमित मिश्राने सांगितलं की, “दोन सामन्यात वाईट पद्धतीने हरलो. केकेआरने 100 धावांनी, जवळपास 98-99 धावांनी हरलो. सनरायझर्सने 9.4 की 9.3 षटकात सामना संपवला. सहा षटकात 91 धावा होत्या. मला स्पष्ट जाणवत होतं की आम्ही त्यांना नेट प्रॅक्टिस देत आहोत. प्रत्येक ठिकाणी षटकार आणि चौकार. मी निराश झालो होतो. जर जी व्यक्ती इतके पैसे लावते आणि असं बघत असेल तर निराश होणार नाही का? इमोशन आहेत.”