विराट कोहली आणि कर्णधारपदाचा नेमका वाद काय होता? सौरव गांगुलीने खरं काय ते सांगितलं
विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यात बिनसल्याच्या अनेक बातम्या वारंवार समोर येत असतात. दोघं समोरासमोर आल्यानंतरही त्यांच्या कृतीतून ही बाब अधोरेखित होत असते. बीसीसीआय अध्यक्ष असताना सौरव गांगुलीच्या खेळीमुळे विराट कोहलीला कर्णधारपद गमवावं लागल्याची चर्चा आहे. यावर आता माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सौरव गांगुली काय म्हणाला ते जाणून घेऊयात..
मुंबई : आयसीसी स्पर्धांमधील अपयशानंतर कर्णधारपदावर टांगती तलवार असते हे काय आता नवीन राहिलं नाही. प्रत्येक देशात असंच काहीसं गणित पाहायला मिळतं. आयसीसी स्पर्धांमधील यश कर्णधारपदाचं आयुष्य वाढवतं हे भुतकाळात पाहता दिसून आलं आहे. असं सर्व घडत असताना पुन्हा एकदा विराट कोहलीच्या कर्णधारपदाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बीसीसीआय अध्यक्षपदी असताना सौरव गांगुलीच्या खेळीमुळे विराट कोहलीने कर्णधारपद सोडलं होतं अशी चर्चा रंगली आहे. आता या प्रकरणावर सौरव गांगुलीने स्पष्टीकरण दिलं आहे. सौरव गांगुलीने सांगितलं की, “मी विराट कोहलीला कर्णधारपदावरून दूर केलं नाही. विराट कोहलीनेच 2021 टी20 वर्ल्डकपनंतर क्रिकेटच्या छोट्या फॉर्मेटमधून कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवण्याची इच्छा व्यक्त केली होती.”
“विराटसोबत टी20नंतर वनडे क्रिकेटचं कर्णधारपद सोडण्यासाठी चर्चा केली होती. कारण व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्प्लिट कर्णधारपद नको होतं. टी20 आणि वनडे क्रिकेटमध्ये एकच कर्णधार असावा ही त्या मागची भूमिका होती.”, असं स्पष्टीकरण माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिलं. रियालिटी शो दादागिरी अनलिमिटेड सीझन 10 मधील एका व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना सौरव गांगुली खरं काय ते सांगून टाकलं.
दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीच्या वक्तव्याने खळबळ उडाली होती. गांगुलीने सांगितलं होतं की, कोहलीशी चर्चा केल्यानंतरच त्याला वनडे कर्णधारपदापासून दूर केलं होतं. तर याच्या उलट प्रतिक्रिया विराट कोहली याची होती. विराट कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितलं की, “जेव्हा दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड होत होती. तेव्हा त्या बैठकीत मला बोलवलं गेलं. निवडकर्त्यांसोबत कसोटी संघाबाबत चर्चा झाली होती. पण मीटिंग संपल्यानंतर त्यांनी मला वनडे कर्णधारपदावरून दूर करण्याचा निर्णय केल्याचं सांगितलं. निवडकर्त्यांच्या निर्णयाला मीही होकार दिला.”
दक्षिण अफ्रिका दौऱ्यानंतर कर्णधारपदाचा वाद चांगलाच तापला. यामुळे विराट कोहली याने तडकाफडकी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित शर्माकडे तिन्ही फॉर्मेटचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. रोहितच्या नेतृत्वात टी20 वर्ल्डकच्या उपांत्य फेरीत, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत, तर वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर विराट कोहलीला सुद्धा नेतृत्वात आयसीसी चषक जिंकण्यात अपयश आलं आहे.