‘आज मी जो काही आहे तो केवळ राहुल द्रविड सरांमुळे’; प्रवीण तांबेने सांगितलं यशाचं रहस्य
प्रवीण तांबे (Pravin Tambe) हे नाव तुम्ही ऐकलेच असेल. गेल्या काही दिवसांपासून या नावाची बरीच चर्चा सुरु आहे. कारण या क्रिकेटपटूच्या संघर्षमय जीवनावर बनलेला बायोपिक (चित्रपट) 1 एप्रिल रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.
मुंबई : प्रवीण तांबे (Pravin Tambe) हे नाव तुम्ही ऐकलेच असेल. गेल्या काही दिवसांपासून या नावाची बरीच चर्चा सुरु आहे. कारण या क्रिकेटपटूच्या संघर्षमय जीवनावर बनलेला बायोपिक (चित्रपट) 1 एप्रिल रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. कौन प्रवीण तांबे? (Kaun Pravin Tambe?) असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा ट्रेलर डिस्ने प्लस हॉटस्टारसह युट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. IPL मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या प्रवीण तांबेच्या जीवनावर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. अभिनेता श्रेयस तळपदे या चित्रपटात प्रवीण तांबे याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातून प्रवीणच्या आयुष्याशी संबंधित सर्व रहस्ये उलगडली जाणार आहेत. हा चित्रपट त्याच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करेल. पण, त्याआधी त्याने एका यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत काही गोष्टींचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत त्याने अनेक गोष्टी सांगितल्या, पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या यशाचे रहस्य, त्यामागे त्याने राहुल द्रविडचा (Rahul Dravid) हात असल्याचे स्पष्ट केले.
माजी दिग्गज भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडने प्रवीण तांबेमधील क्रिकेटपटू ओळखला आणि त्याला संधी दिली. ‘स्पोर्ट्स विथ रविश’ नावाच्या यूट्यूब चॅनलशी झालेल्या संभाषणात प्रवीण तांबेने राहुल द्रविडला आपल्या यशाचं श्रेय दिलं आहे. आज मी जो काही आहे तो केवळ राहुल सरांमुळे आहे, असे तो म्हणाला.
राहुल सरांनी छाप पाडण्याची संधी दिली – प्रवीण तांबे
प्रवीण तांबे यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “जेव्हा लोक माझ्या वयावरुन प्रश्न विचारत होते. त्यादरम्यान राहुल सरांनी माझं काम पाहिलं. माझ्या गोलंदाजीचा प्रभाव पाहिला. आज मी जो काही आहे तो राहुल सरांमुळे. त्यांच्या हाताखाली आयपीएलमध्ये खेळणे, त्यांच्याशी बोलणे हे माझे स्वप्न होते, जे आयपीएलमध्ये साकार झाले.
तो म्हणाला, “राहुल सर मला सांगायचे जा आणि परफॉर्म कर. त्यांचे हे शब्द मला प्रेरणा देत असत. त्यांच्या या शब्दांनी मला नेहमीच पुढे जाण्याची प्रेरणा दिली आणि, मी प्रगती करत गेलो.”
प्रवीण तांबेची क्रिकेट कारकीर्द
2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रवीण तांबेने या लीगमधील 33 सामन्यांमध्ये 28 विकेट्स घेतल्या. याशिवाय त्याने 2013 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2 सामन्यात 2 बळी घेतले. 2017 मध्ये त्याने लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. यामध्ये त्याने 6 सामने खेळले आणि 5 विकेट घेतल्या.
याच्या 41 व्या वर्षी आयपीएलमध्ये डेब्यू
प्रवीण तांबे हा मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातला मुलगा. इंडियन प्रिमियर लीग सारख्या स्पर्धेपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने केलेला संघर्ष या चित्रपटातून उलगडला आहे. प्रवीण तांबे हे मुंबईच्या टेनिस क्रिकेटमधलं एक मोठ नाव. गल्लीबोळातून वरती आलेल्या प्रवीण तांबेंनी मुंबईच टेनिस क्रिकेट गाजवलंच, पण सीजन बॉलने खेळल्या जाणाऱ्या लेदर क्रिकेटमध्येही आपली ओळख निर्माण केली. तुमच्यात टॅलेंट असेल, तर जग तुमची दखल घेत, हेच या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. क्रिकेटपटूने वयाची पसतीशी ओलांडली की, ते निवृत्ती घेतात. पण प्रवीण तांबेंनी वयाच्या 41 व्या वर्षी आयपीएलमध्ये डेब्यू केला.
मुंबईतल्या चाळीमधून पुढे आलेल्या मुलाची ही कथा प्रेरणा देईल
‘कौन प्रवीण तांबे’चा ट्रेलर जबरदस्त आहे. हा ट्रेलर तुमच्या अंगावर काटा आणतो. दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये प्रवीण तांबेंना क्रिकेटपटू म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी किती संघर्ष करावा लागला, ते दाखवलंय. तुमच्यात टॅलेंट असलं, तरी वाटेत अनेक अडथळे असतात. ते पार करताना कुटुंब, समाज यांच्याबरोबर कसं लढाव लागतं. समोरच्या माणसाच्या अविश्वासाचं दु:ख कसं पचवाव लागतं ते सर्व या चित्रपटातून मांडलं आहे.
इतर बातम्या