World Cup: वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील एखाद्या सामन्यात पाऊस पडला तर काय? जाणून घ्या गणित
ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. भारतात स्पर्धा होत असल्याने काही स्पर्धांवर पावसाचं सावट असणार आहे. यावेळी आयसीसीचं गणित कसं असेल ते जाणून घ्या
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा 10 संघांमध्ये होणार आहे. यात भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडचा समावेश आहे. 48 वर्षात पहिल्यांदाच वेस्ट इंडिज या स्पर्धेत खेळणार नाही. या स्पर्धेत पात्र होण्यास वेस्ट इंडिजचा संघ अपयशी ठरला आहे. दुसरीकडे ही स्पर्धा 2019 प्रमाणे रॉबिन राउंड प्रकारात खेळली जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक संघ साखळी फेरीत 9 सामने खेळणार आहे. यात टॉपला असलेले चार संघ उपांत्य फेरी गाठतील. त्यामुळे या स्पर्धेला रंगत जसजसे सामने पुढे जातील तशी येईल. उपांत्य फेरी गाठण्यासाठी कोणत्याही संघाला साखळी फेरीत 7 सामने जिंकले की सोपं होणार आहे. अन्यथा गणित जर तरंच असणार आहे. असं असताना पावसाचं देखील सावट असणार आहे. अशा वेळी आयसीसीचं गणित कसं असेल ते समजून घेऊयात..
पाऊस पडला तर रिझर्व्ह डे असेल का?
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 48 सामने होणार आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 5 ऑक्टोबरला स्पर्धेची सुरुवात होईल. तसेच अंतिम फेरीचा सामनाही याच मैदानात होणार आहे. 45 दिवसात 10 मैदानावर 48 सामने होणार आहेत. अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, पुणे, हैदराबाद, बंगळुरु, धर्मशाळा आणि लखनऊमध्ये ही सामने खेळले जाणार आहेत.
साखळी फेरीतील सामन्यांसाठी कोणताही रिझर्व्ह डे नसेल. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबला तर वेळेनुसार षटकं कमी केली जातील. तसेच डकवर्थ लुईस नियमानुसार आव्हान दिलं असेल आणि प्रतिस्पर्धी संघाचा 20 षटकांचा सामना पूर्ण झाला. तर डकवर्थ लुईस नियमानुसार विजयी घोषित करण्यात येईल. अन्यथा दोन्ही संघांना प्रत्येकी एक पॉईंट दिला जाईल. उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस असणार आहे. रिझर्व्ह डे दिवशी सामना जिथे थांबला तिथूनच सुरु होणार आहे. म्हणजेच सामना नव्याने खेळला जाणार नाही.
वर्ल्डकप स्पर्धेसाठी बक्षीसी रक्कम
वर्ल्डकपसाठी एकूण 10 मिलियन डॉलर म्हणजेच 83 कोटी 21 लाख 87 हजार रुपयांची रक्कम असेल. विजेत्या संघाला 4 मिलियन यूएस डॉलर म्हणजेच 33 कोटी रुपये मिळतील. उपविजेत्या संघाला 16 कोटी मिळतील. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी 6.63 कोटी रुपये मिळतील. साखळी फेरीतून उपांत्य फेरी न गाठणाऱ्या सहा संघांना प्रत्येकी 82 लाख रुपये मिळतील.