वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना टाय झाला तर काय? जाणून घ्या
World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता हळूहळू पुढे जात आहे. पाचव्या टप्प्यानंतर उपांत्य फेरीचं गणितही स्पष्ट होताना दिसेल. दुसरीकडे, उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना टाय झाला तर काय? असा प्रश्न पडला आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप 2019 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना कोणीही विसरू शकत नाही. सामना टाय झाला आणि सुपर ओव्हरमध्ये गेला. तिथेही टाय झाला आणि चौकारांच्या संख्येवर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. न्यूझीलंडच्या हातातोंडचा घास असा हिरावून गेला. त्यामुळे या निर्णयावर अनेक आजी माजी खेळाडूंनी टीका केली होती. त्यामुळे यंदाही उपांत्य आणि अंतिम फेरीत अशी स्थिती निर्माण झाली तर काय नियम असेल? असा प्रश्न विचारला जात आहे. खरं तर स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच आयसीसीने आपल्या नियमात बदल केला आहे. पण अनेक क्रीडा रसिकांना याबाबतची माहिती नाही. साखळी फेरीत सामना टाय झाला तर प्रत्येकी एक गुण दिला जाईल. पण उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी आयसीसीने नव्या नियमाची भर घातली आहे.
वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी सुपर ओव्हरचा नियम ठेवला गेला आहे. म्हणजेच साखळी फेरीत सुपर ओव्हर होणार नाही. तसेच दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. जर उपांत्य फेरीचा सामना टाय झाला तर सुपर ओव्हरमधून निकाल दिला जाईल. त्यातही सामना टाय झाला तर पुन्हा सुपर ओव्हर केली जाईल. निकाल येईपर्यंत सुपर ओव्हर खेळल्या जातील. म्हणजेच क्रीडा रसिकांना थरार अनुभवायला मिळेल.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 10 संघ आहेत. यापैकी गुणतालिकेत टॉप 4 वर असलेल्या संघांना उपांत्य फेरीत स्थान मिळेल. सध्याच्या स्थितीत गुणतालिकेत भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान हे संघ टॉपला आहेत. अव्वल स्थानी असलेला संघ चौथ्या स्थानावर संघाशी सामना खेळेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ आमनेसामने येतील. पहिला उपांत्य फेरीचा साना 15 नोव्हेंबरला, तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना 16 नोव्हेंबरला होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात गुरुवारी होणार आहे. पुण्यातील एमसीए मैदानावर हा सामना होणार आहे. बांगलादेश विरुद्धचा सामना जिंकताच टीम इंडियाला अव्वल स्थान गाठता येणार आहे.