CSK vs GT: चेपॉक मैदानातील ‘पिच नंबर 5’ चं रहस्य काय? याच खेळपट्टीवर होणार चेन्नई विरुद्ध गुजरात क्वॉलिफायर सामना
IPL 2023 Qualifier 1: आयपीएल 2023 स्पर्धेतील पहिला क्वॉलिफायर सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानातील पिच नंबर 5 वर खेळला जाणार आहे. या खेळपट्टीने धोनीला चकवा दिला होता.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील महत्त्वपूर्ण असा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानातील पिच नंबर 5 वर होत आहेत. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाला क्वॉलिफायर 2 मधील विजेत्या संघाशी लढावं लागणार आहे. त्यामुळे थेट अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघ जीवाची बाजी लावतील, यात दुमत नाही. पण खेळाडूंसोबत खेळपट्टीही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे चेपॉकच्या पिच नंबर पाचची जोरदार चर्चा रंगली आहे. या पिचमध्ये नेमकं असं काय आहे की, महेंद्रसिंह धोनीलाही चकवा बसला होता. त्यामुळे महत्त्वपूर्ण सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर काय निवडावं असा प्रश्न पडल्याशिवाय राहाणार नाही.
आयपीएल 2023 मध्ये चेपॉकच्या पिच नंबर 5 वर याआधीही सामना खेळला गेला आहे. या मैदानात फलंदाजांनी धावांचा वर्षाव केला आहे. 30 एप्रिल 2023 रोजी पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना खेळला गेला. चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी निवडत या मैदानावर 20 षटकात 4 गडी गमवून 200 धावा केल्या. पंजाबने हे लक्ष्य शेवटच्या चेंडूवर पूर्ण करून विजय मिळवला. या पराभवानंतर चेन्नईने मोठा धडा घेतला आहे. तसेच गुजरात टायटन्सलाही या खेळपट्टीचा अंदाज आला आहे.
चेपॉक पिच नंबर 5 चं रहस्य काय आहे?
नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार या खेळपट्टीवर पहिल्यांदा फलंदाजी निवडणं पसंत करतो. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पंजाब विरुद्ध नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी निवडली होती. त्यानंतर शिखर धवनला कौल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता असं विचारल्यावर, त्यानेही फलंदाजी असंच उत्तर दिलं. पण निकाल लागल्यानंतर ही खेळपट्टी लक्ष्य गाठण्यासाठी उत्तम असल्याचं समोर आलं आहे.
नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पांड्या पहिल्यांदा गोलंदाजी करणं पसंत करतील, असंच दिसतंय. पिच नंबर 5 वर यापूर्वी वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली आहे. मागच्या सामन्यातील 10 पैकी 6 विकेट्स दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजांनी पदरात पडल्या आहेत.
चेन्नई आणि गुजरात या स्पर्धेत दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. पहिल्या सामन्यात गुजरातने नाणेफेकीचा कौल जिंकत गोलंदाजी घेतली होती. चेन्नईने 20 षटकात 7 गडी गमवून 178 धावा केल्या होत्या. हे आव्हान गुजरातने 5 गडी गमवून 19.2 षटकात पूर्ण केलं. आयपीएल इतिहासात तीन वेळा चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आले आहेत. तिन्ही सामन्यात गुजरातने चेन्नईला मात दिली आहे. तिन्ही सामन्यात गुजराने धावांचं लक्ष्य गाठलं आहे.