रोहित शर्माने गोलंदाजी देताना कोणती रणनिती अवलंबली? वरुण चक्रवर्तीने केला मोठा खुलासा
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत वरुण चक्रवर्तीची अचानक एन्ट्री झाली. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सोबत घेतलं आणि थेट चॅम्पियन्स ट्रॉफीत निवड झाली. जसप्रीत बुमराहमुळे टीम इंडियाला धक्का बसला होता. पण वरुणने फिरकीच्या जोरावर सर्व टेन्शन दूर केलं. पण संघात निवड ते योग्यवेळी गोलंदाजी हे गणित कसं जुळलं त्याबाबत वरुणने स्वत: खुलासा केला.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत जसप्रीत बुमराह खेळणार नाही हे समजताच क्रीडाप्रेमींच्या पायाखालची वाळू सरकली होती. कारण त्याच्याशिवाय प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणणं कठीण होतं. पण टीम व्यवस्थापनाने एक डाव खेळत वरुण चक्रवर्तीला त्याच्या जागी संघात सहभागी केलं. खरं तर बुमराह ऐवजी वरुण हे गणित काही रुचणारं नव्हतं. पण हेच गणित टीम इंडियाच्या विजयाचं कारण ठरलं. वरुण चक्रवर्तीने आपल्या भेदक गोलंदाजीने विरोधी संघांचं कंबरडं मोडलं. तसेच टीम इंडियाला विजयाची चव चाखण्यास मदत केली. मात्र या रणनिती मागे रोहित शर्माचं डोकं होतं असं खुद्द वरुण चक्रवर्ती याने सांगितलं. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रोहित शर्माने त्याचा प्रत्येक फेजमध्ये वापर केला होता. त्याचा थेट फायदा टीम इंडियाला झाला.
वरुण चक्रवर्तीने स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितलं की, ‘रोहित शर्माने माझा बऱ्यापैकी वापर केला. मी पॉवर प्लेमध्ये 2 षटकं, डेथ ओव्हरमध्ये 2 ते 3 षटकं आणि मिडल ओव्हरमध्ये जेव्हा विकेटची गरज होती तेव्हा गोलंदाजी केली. मी त्याला सांगितलं होतं की याच पद्धतीने माझी क्षमता वाढवली जाऊ शकते. त्याने माझं म्हणणं जास्त काही न बोलताच समजून घेतलं. कारण रोहित शर्मा एक महान कर्णधारांपैकी एक आहे.’ दरम्यान, वरुण चक्रवर्तीला पाचवा फिरकीपटू निवडल्याने अनेकांनी टीका केली होती. पण रोहित शर्माचा हा डाव प्रतिस्पर्धी संघांवर भारी पडला.
रोहित शर्माने बांग्लादेश आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वरुण चक्रवर्तीला आराम दिला होता. पण न्यूझीलंड, उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी प्लेइंग 11 मध्ये घेतलं. न्यूझीलंडचा विकेटचा पंच मारल्यानंतर ऑस्ट्रेलिया त्याच्या मिस्ट्रीत अडकली. साखळी फेरीत न्यूझीलंडविरुद्ध 10 षटकात 42 धावा देत 5 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 10 षटकात 49 धावा देत 2 विकेट घेतल्या. यात ट्रेव्हिस हेडची महत्त्वाची विकेट होती. तर अंतिम सामन्यात 10 षटकात 45 धावा देत 2 गडी बाद केले. वरुण चक्रवर्तीने 3 सामन्यात 9 विकेट घेतल्या. यासह स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला.