मुंबई: गुजरात टायटयन्सच्या (Gujarat Titans) विजयाने काल इंडियन प्रिमीयर लीग (IPL) स्पर्धेचा समारोप झाला. सीजन सुरु झाला, तेव्हा गुजरातचा संघ विजेतेपद मिळवेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण काल गुजरातने विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली, तेव्हा सगळ्यांनीच त्यांचं कौतुक केलं. गुजरात टायटन्स या स्पर्धेमध्ये एक परिपूर्ण संघ वाटला. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात गुजरातची टीम संतुलित होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुजरातच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, तो त्यांचा कॅप्टन हार्दिक पंड्याने. (Hardik pandya) हार्दिक पंड्याने या संपूर्ण सीजनमध्ये कमालीचा खेळ दाखवला. सीजन सुरु होण्याआधी हार्दिक पंड्याच्या फिटनेसबद्दल प्रश्नचिन्ह होतं, तो पुन्हा भारतीय संघातून कधी खेळू शकेल का? अशी सुद्धा चर्चा होती. पण सीजनच्या अखेरीस हार्दिक पंड्याकडे भविष्यातील कॅप्टन या दृष्टीने पाहिलं गेलं. हार्दिकने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात सरस खेळ दाखवलाच. पण त्याच्यातला एक गुण सर्वात जास्त भावला, तो म्हणजे कॅप्टनशिप. हार्दिक पंड्यामधील नेतृत्वगुण आयपीएलच्या निमित्ताने प्रखरपणे समोर आलें.
आयपीएल सुरु होण्याआधी हार्दिक पंड्या उत्तम कॅप्टन ठरेल, असं छातीठोकपणे कोणी म्हटलं नसतं. पण आज त्याच्यातला तोच गुण अनेक दिग्गजांना भावलाय. भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्करही याला अपवाद नाहीत. इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेत कॅप्टन म्हणून हार्दिक पंड्याचा उदय झालाय. ‘नेतृत्व हे हार्दिक पंड्याच्या खेळाचं एक अंग आहे’ असं सुनील गावस्कर म्हणाले.
हार्दिक पंड्याने काल फायनलमध्ये स्वत: आघाडीवर राहून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध त्याने 16 धावा देत तीन विकेट काढल्या. शिवाय फलंदाजी करताना 34 धावा केल्या. हार्दिक फलंदाजीला आला, तेव्हा दोन विकेट लवकर गेल्या होत्या. शुभमन गिलसोबत खेळपट्टिवर थांबून त्याने डावाला आकार दिला. कॅप्टन म्हणून आपली जबाबदारी त्याने चोख पार पाडली.
“नेतृत्वगुण हा हार्दिकच्याच खेळाचा एक भाग आहे. त्याच्या या गुणाबद्दल फार जणांना माहिती नव्हती” असं सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाले.
“तो कशी बॅटिंग, बॉलिंग करु शकतो हे माहित होतं. पण सीजन सुरु होण्याआधी हार्दिक त्याच्या कोट्याची 4 षटक टाकू शकेल का? याबद्दल प्रश्न होता. पण त्याने व्यवस्थित गोलंदाजी केली. त्याने त्याच्याकडून ऑलराऊंडर म्हणून असलेली अपेक्षा पूर्ण केली. आता सर्वच आनंदी आहेत” असं सुनील गावस्कर म्हणाले.
“त्याने ज्या पद्धतीने संघाचे नेतृत्व केले. सर्व टीम त्याने ज्या प्रकारे बांधली, त्यांना एकत्र ठेवलं, यावरुन त्याच्याकडे नेतृत्वगुण असल्याचं दिसून येतं” असं गावस्कर म्हणाले. “तुमच्याकडे नेतृत्व गुण असतील, तर राष्ट्रीय संघाचं कर्णधारपद भुषवण्यासाठी दरवाजे आपोआप उघडले जातात. सध्या 3-4 नाव चर्चेत आहेत. हार्दिक त्या शर्यतीत आहे, असं मी म्हणणार नाही. पण निवड समितीकडे एक चांगला पर्याय नक्कीच आहे” असं गावस्कर म्हणाले.