आयपीएलमध्ये प्रेक्षक हार्दिक पांड्याला डिवचत होते, तेव्हा….! जसप्रीत बुमराहने सांगितली ‘मन की बात’
आयपीएलचं 17वं पर्व हार्दिक पांड्याला काही खास गेलं नाही. सर्वच बाजूने टीकेचा धनी ठरला. गुजरात टायटन्सकडून मुंबईत आला आणि कर्णधारपदाची सूत्र हाती घेतली. पण त्याला मुंबई इंडियन्स चाहत्यांच्या रोषाला सामोर जावं लागलं. मैदानात त्याच्याविरोधात घोषणाबाजी आणि डिवचण्याचे प्रकार पाहिले गेले. यावर आता जसप्रीत बुमराहाने मौन सोडलं आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेत रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सची धुरा हाती घेतली. गुजरात टायटन्सकडून ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबईने हार्दिकला संघात घेतलं आणि कर्णधारपदही दिलं. मात्र ही बाब काय मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना रुचली नाही. हार्दिक पांड्याला मैदानात डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. नाणेफेकीवेळी हार्दिकला डिवचण्याचे प्रकार घडले. वानखेडे स्टेडियममध्ये नाणेफेकीवेळी ही तीव्रता आणखी प्रखरपणे जाणवली. आयपीएलच्या नव्या पर्वाची सध्या चर्चा सुरु आहे. असं असताना भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराहने याबाबत आपलं मन मोकळं केलं. हार्दिक पांड्याच्या अडचणीच्या काळात मुंबई इंडियन्स संघ त्याच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं सांगितलं.
“आम्ही हार्दिकसोबतच होतो. त्याच्यासोबत बोलत होतो. त्याला सपोर्ट करण्यासही तयार होतो. पण काही गोष्टी समजण्यापलीकडे असतात. त्याच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकत नाही. जर असं काही घडलं असेल तर ते घडलं.” असं जसप्रीत बुमराहने हार्दिक पांड्याबाबत सांगितलं. टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचं हार्दिकबाबतचं मत मात्र बदलल्याचं दिसून आलं. वानखेडे स्टेडियमवर त्याचा सन्मान केला गेला. ‘जेव्हा आम्ही वर्ल्डकप जिंकलो तेव्हा सर्व चित्र पालटून गेलं. हा एक प्रवासाचा भाग आहे. आम्ही शक्य तितका पाठिंबा देत राहू.’, असंही जसप्रीत बुमराह पुढे म्हणाला.
गोलंदाजांची बाजू घेत जसप्रीत बुमराहने दोन नियम रद्द करण्याच्या पारड्यात आपलं मत टाकलं. “क्रिकेटमधून नो बॉल आणि फ्री हिट संपवलं पाहीजे.”, असं मत जसप्रीत बुमराहने व्यक्त केलं. तसेच बुमराहने कसोटी क्रिकेटची स्तुती केली. “मी ज्या पिढीतून आलो आहे. तेव्हा टीव्हीवर जास्तीत जास्त कसोटी क्रिकेट दाखवलं जात होतं. आजही सर्वात मोठा फॉर्मेट आहे. मला असं वाटतं की येथे चांगलं प्रदर्शन केलं तर इतर फॉर्मेटमध्ये आपोआप सर्वकाही चांगलं घडेल.”, असं जसप्रीत बुमराह पुढे म्हणाला. आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. आता कोणते प्लेयर्स रिटेन होतात आणि रिलीज केले जातात याची उत्सुकता आहे.