IND vs BAN 1st Test : भारत बांग्लादेश कसोटी सामना कुठे आणि कसा पाहता येईल? जाणून घ्या
भारत आणि बांग्लादेश कसोटी सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर ही कसोटी मालिका असल्याने क्रीडाप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत. बांगलादेश संघ कशी कामगिरी करतो याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, हा सामना कुठे पाहता येईल ते जाणून घेऊयात
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरला होत आहे. आतापर्यंत दोन्ही संघ 13 वेळा आमनेसामने आले आहे. त्यापैकी 11 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर दोन सामने अनिर्णित ठरले आहेत. आता दोन्ही देशातील 14वी कसोटी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होत आहे. दोन्ही संघाना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. बांगलादेशचा संघ स्पर्धेत उलटफेर करण्यासाठी ग्राह्य धरला जातो. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांची धाकधूक वाढली आहे. पाकिस्तानला त्यांच्या भूमीवर व्हाईटवॉश देईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण स्वप्नवत वाटणारी ही गोष्ट खरी ठरली आहे. नुकतंच बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोने सांगितलं की, आमचा संघ भारताला पराभूत करण्यास सक्षम आहे. पहिल्या कसोटी सामन्यात हसन महमूद, नशीद राणा आणि तस्कीन अहमद यांच्या कामगिरीवर लक्ष असेल. तर शाकिब अल हसन आणि मेहदी हसनवर फिरकीची जबाबदारी असेल.
भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना कधी खेळला जाईल.
भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2024 दरम्यान खेळला जाईल.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना कुठे होईल?
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. 2021 नंतर चेपॉक मैदानावरील हा पहिला कसोटी सामना असेल.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी सुरु होईल?
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरला सकाळी 9.30 वाजता सुरु होईल. नाणेफेकीचा कौल सकाळी 9 वाजता होईल.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना कोणत्या ओटीटीवर पाहता येईल?
भारत आणि बांग्लादेश कसोटी सामना जिओ सिनेमा एप आणि जिओ सिनेमा वेबसाईटवर लाईव्ह पाहता येईल. लाईव्ह स्ट्रीमिंग मोफत असेल.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना स्पोर्ट्स 18-1एसडी, स्पोर्ट्स 18-1 एचडी, स्पोर्ट्स 18-2 हिंदी या चॅनेलवर पाहता येईल.