Special Story | कसोटी कर्णधार म्हणून योग्य कोण, अजिंक्य की विराट? पाहा दोघांची आकडेवारी
अजिंक्यने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत 2-1 च्या फरकाने विजय मिळवून दिला.
मुंबई : मराठमोळ्या अजिंक्य राहणेने (Ajinkya Rahane) आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी मालिकेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. यानंतर अजिंक्यला टीम इंडियाचा कसोटी कर्णधार करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. रहाणेनं मालिका जिंकून दिल्याने त्याची तुलना टीम इंडियाचा (Team India) नियमित कर्णधार विराट कोहलीसोबत (Virat Kohli) करण्यात येत आहे. कसोटीत विराट ऐवजी रहाणेलाच कर्णधार करावं, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे. या निमित्ताने आपण विराट आणि रहाणे यांची कर्णधार म्हणून कसोटीतील कामगिरी पाहणार आहोत. त्याआधी रहाणेने या ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत कशाप्रकारे विजय मिळवून दिला हे पाहुयात. (who is right as test captain ajinkya rahane or virat kohli see statistics for both)
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटीत लाजीरवाणा पराभव झाला. यामुळे टीम इंडिया 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर पडली. विराट बाबा होणार असल्याने पहिल्या कसोटीनंतर तो मायदेशी परतला. यामुळे अजिंक्य रहाणेला उर्वरित 3 कसोटींसाठी टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळाली. टीम इंडिया आधीच 1-0 ने पिछाडीवर होती. त्यात विराट मायदेशी परतला. अनेक अनुभवी खेळाडू दुखापतग्रस्त होते. मात्र यासर्व अडचणींवर रहाणेने मात केली. नवख्या खेळाडूंना त्याने विश्वास दिला. मुक्तपणे खेळण्याचं स्वातंत्र्य दिलं.
कागांरुंविरुद्ध लढण्यासाठी त्याने योजना आखली. त्या योजनेची योग्यरित्या अंमलबजावणी केली. परिणामी टीम इंडियाने दुसऱ्या जोरदार पुनरागमन केलं. दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. यामुळे मालिका 1-1 ने बरोबरीत झाली. तिसरा सामनादेखील रंगतदार स्थितीत होता. हा सामना कोणत्याही क्षणी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने जाण्याची शक्यता होती. मात्र हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन या जोडीने निर्णायक भागीदारी केली. हनुमा विहारीने टीम इंडियासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. तर अश्विननेही विहारीला साथ दिली. यामुळे तिसरा सामना अनिर्णित राहिला. यामुळे मालिकेत पुन्हा 1-1 ने बरोबरीत राहिली.
चौथा सामना मालिकेच्या दृष्टीने महत्वाचा होता. सामना तिसऱ्या दिवसापर्यंत बरोबरीत होता. मात्र चौथ्या दिवशी सामना रंगतदार स्थितीत आला. कांगारुंना पहिल्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली होती. टीम इंडियाने कांगारुंना दुसऱ्या डावात 294 धावांवर ऑलआऊट केलं. यामुळे भारताला विजयासाठी 328 धावांचे आव्हान मिळाले. चौथ्या दिवसखेर टीम इंडियाने बिनबाद 4 धावा केल्या. पाचव्या दिवशी कांगारुंना विजयासाठी 10 विकेट्सची आवश्यकता होती. तर भारताला मालिका जिंकण्यासाठी आणखी 324 धावा हव्या होत्या.
सामना रोमाचंक स्थितीत आला होता. दोन्ही संघांना सामना जिंकण्याची समसमान संधी होती. सामना इतका रोमाचंक झाला की बोल टु बोल धावा आल्या. कसोटी कमी टी 20 सामना अधिक वाटत होता. टीम इंडियाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी सार्थपणे भूमिका बजावली. यानंतर रिषभ पंतने इतर फलंदाजांसह भारताला थरारक विजय मिळवून दिला. शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले. टीम इंडियाने कांगारुंचा माज उतरवला. यासह रहाणेच्या नेतृत्वातील टीम इंडियाचा हा चौथा कसोटी विजय ठरला.
कर्णधार म्हणून रहाणेची कसोटीमधील कामगिरी
रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाचा कसोटी मालिकेत एकदाही पराभव झालेला नाही. रहाणेने टीम इंडियाचं आतापर्यंत कसोटीत एकूण 5 सामन्यात नेतृत्व केलं आहे. रहाणेने आपल्या नेतृत्वात या 5 पैकी 4 सामन्यात भारताला विजय मिळवून दिला आहे. तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे. या 4 विजयांपैकी 3 विजय हे ऑस्ट्रेलियाविरोधात मिळवले आहेत. तर एका सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला होता.
अजिंक्यला पहिल्यांदा 2017 मध्ये कसोटीत टीम इंडियाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. अजिंक्यला विराट अनुपस्थितीत असल्याने ही संधी मिळाली. हा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरोधात धर्मशाळा येथे खेळण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाने कांगारुंचा 8 विकेट्सने पराभव केला. यासह 2-1 च्या फरकाने मालिकाही जिंकली.
रहाणेला यानंतर 2018 मध्ये अफगाणिस्तानविरोधात बंगळुरुत झालेल्या कसोटीसाठी कॅपटन्सीची जबाबदारी मिळाली. टीम इंडियाने या सामन्यात अफगाणिस्तानवर डाव आणि 262 धावांनी विजय मिळवला. तर यानंतर रहाणेला ऑस्ट्रेलियाविरोधातील या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत नेतृत्वाची जबाबदारी मिळाली. रहाणेने या मालिकेतील दुसरा सामन्यात विजय, तिसरा सामना अनिर्णित आणि चौथ्या सामन्यात पुन्हा विजय मिळवून दिला.
रहाणे अतिशय शांत आणि संयमी आहे. तो नेहमी युवा खेळाडूंना प्रोत्साहन देतो. खेळाडूंना समजून घेतो. वेळोवेळी त्या खेळाडूंना लीड करण्याची संधी देतो. रहाणेने त्याच्या या स्वभावामुळे आणि कामगिरीमुळे क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. यामुळे रहाणे आणि विराटची तुलना होऊ लागली. रहाणेला कसोटीमध्ये कर्णधार करा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
विराटची नेतृत्वातील कामगिरी
विराटने आतापर्यंत एकूण 56 कसोटींमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. या 56 पैकी 33 सामन्यात विरोधी संघावर विजय मिळवला आहे. तर 13 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच 10 सामने अनिर्णित राखण्यात यश आले आहे. विराट हा टीम इंडियाचा कसोटीमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक कर्णधार राहिला आहे. विराटची कसोटीत कर्णधार म्हणून आकडेवारीही चांगली आहे. यानंतरही विराटऐवजी रहाणेलाच कसोटीत कर्णधार करा, अशी मागणी केली जात आहे.
रहाणेला कर्णधार करण्यामागे आणखी काही कारणं सांगितले जात आहेत. विराट सध्या कसोटी, वनडे आणि टी 20 या तिन्ही प्रकारांमध्ये भारताचं नेतृत्व करतो. त्यामुळे रहाणेला कसोटीमध्ये नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्यास विराटला आणखी चमकदार कामगिरी करता येईल, तसेच विराटला जबाबदारीतून मुक्त होऊन खेळता येईल, असंही म्हणण्यात येत आहे. त्यामुळे अजिंक्यला नेतृत्व करायला द्यावं, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची ही मागणी कितपत मान्य केली जाते याकडे सर्वच अजिंक्यच्या चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
संबंधित बातम्या :
Ind Vs Aus | एक ही तो दिल है, कितनी बार जितोगे?
Ajinkya Rahane | ना कोहली, ना बुमराह, नवख्या खेळाडूंना घेऊन अजिंक्य रहाणे कसा जिंकला?
(who is right as test captain ajinkya rahane or virat kohli see statistics for both)