देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा टप्पा पार पडला आहे. या स्पर्धेत एकूण चार संघ सहभागी झाले असून इंडिया ए, इंडिया बी, इंडिया सी आणि इंडिया डी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. प्रत्येक संघ रॉबिन राउंड पद्धतीने एकूण तीन सामने खेळणार आहे. त्यापैकी प्रत्येक संघाचे दोन सामने खेळून झाले असून शेवटचा सामना शिल्लक आहे. हा सामना 19 सप्टेंबरला होणार आहे. खरं तर दुलीप ट्रॉफी स्पर्धेत बाद फेरीचे सामने होणार नाहीत. या स्पर्धेतील विजेता हा गुणतालिकेत अव्वल असलेला संघ ठरेल. त्यामुळे गुणातिलेकत टॉपला राहण्यासाठी संघांमध्ये चुरस आहे. पण श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील डी संघ सलग दुसऱ्यांदा पराभूत झाल्याने या शर्यतीतून बाद झाला आहे. त्यामुळे उर्वरित तीन संघांकडे जेतेपदाची संधी आहे. यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील इंडिया सी संघ फेव्हरेट मानला जात आहे. चला जाणून घेऊया इंडिया ए, इंडिया बी आणि इंडिया सी संघाचं गणित..
इंडिया ए संघाने नुकतंच इंडिया डी संघाला पराभूत केलं आहे. या विजयामुळे 6 गुणांची कमाई केली असून तिसऱ्या स्थानावर आहे. आता इंडिया ए संघाचा सामना इंडिया सी संघासोबत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना जेतेपदाची समान संधी आहे. हा सामना ए संघाने एका डावाने जिंकला तर 7 गुण मिळतील आणि 13 गुण होतील. त्यामुळे जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होईल. पण सर्वस्वी इंडिया बी संघावर अवलंबून राहावं लागेल. कारण इंडिया बी संघाचे 7 गुण आहेत. त्यांनीही इंडिया डी सोबतचा सामना नुसता जिंकला तर 6 गुण मिळवून 13 गुण होतील. पण एका डावाने जिंकला तर 7 गुणांसह 14 गुण होतील आणि इंडिया ए पेक्षा वरचढ ठरेल.
दुसरीकडे, ऋतुराज गायकवाडचा संघ या स्पर्धेच्या जेतेपदासाठी फेव्हरेट मानला जात आहे. कारण इंडिया सी संघाचे 9 गुण आहेत. इंडिया ए संघाला नुसतं पराभूत केलं तर 15 गुण होतील. या गुणांच्या आसपास कोणीच पोहोचू शकत नाही. त्यामुळे इंडिया सी जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. पण हा सामना ड्रॉ झाला तर बी संघाला संधी मिळू शकते. कारण नव्या गुणप्रणालीनुसार एका डावाने विजयी संघाला 7 गुण, चौथ्या डावात विजय मिळवलेल्या संघाला 6 गुण, सामना अनिर्णित ठरला आणि पहिल्या डावात आघाडी असेल तर 3 गुण, सामना अनिर्णित ठरला आणि पहिल्या डावात पिछाडीवर असेल तर 1 गुण मिळतो.
इंडिया सी आणि इंडिया बी यांच्यात दुसरा सामना नुकताच पार पडला. हा सामना होण्यापूर्वी दोन्ही संघांचे प्रत्येकी 6 गुण होते. पण पहिल्या डावात इंडिया सी संघाकडे आघाडी होती. त्यामुळे ऋतुराजच्या संघाला 3 गुण मिळाले, तर अभिमन्यू ईश्वरनच्या बी संघाला 1 गुण मिळाला. त्यामुळे इंडिया सी संघाचे 9 गुण, इंडिया बी संघाचे 7 गुण झाले आहेत. दुसरीकडे, इंडिया डी संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. कारण दोन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे खात्यात 0 गुण आहेत. पुढचा सामना एका डावाने जिंकला तरी जास्तीत 7 गुण होतील. पण यापेक्षा जास्त गुण ऋतुराजच्या संघाकडे आहेत.