आयपीएल जेतेपद कोणीही जिंको, विराट कोहलीच किंग! का ते जाणून घ्या
आयपीएल 2024 स्पर्धेच्या जेतेपदासाठी आता तीन संघच शर्यतीत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे तीन संघांमध्ये रस्सीखेच आहे. त्यात हैदराबाद आणि राजस्थानचा फैसला पुढच्या काही तासात होईल. त्यामुळे अंतिम फेरीत कोलकात्याशी कोण लढणार हे स्पष्ट होईल. पण असं असलं तरी विराटच बेस्ट ठरेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. का ते समजून घ्या
आयपीएल 2024 स्पर्धेतील आरसीबीचा जेतेपदाचा प्रवास एलिमिनेटर फेरीतच संपुष्टात आला आहे. राजस्थान रॉयल्सने आरसीबीला 4 विकेट्स राखून पराभूत केलं आणि पुढचा प्रवास थांबला. असं असलं तरी विराट कोहली फायनलपर्यंत रेसमध्ये असणार आहे. इतकंच काय त्याच्या आसपासही कोणी फिरकणं कठीण आहे. असंच चित्र सध्या दिसत आहे. आम्ही दुसरं तिसरं कसलं नाही तर ऑरेंज कॅपची चर्चा करत आहोत. गेल्या काही दिवसांपासून ऑरेंज कॅपचा मानकरी विराट कोहली आहे. त्याच्या आसपासही कोणताच खेळाडू दिसत नाही. राजस्थान रॉयल्स आणि सनराझर्स हैदराबाद या संघातील काही खेळाडू रेसमध्ये आहेत. पण विराट कोहलीला गाठणं काही शक्य नाही. कारण विराट कोहलीला गाठायचं तर शतकी खेळी करावी लागेल. क्वॉलिफायर 2 आणि अंतिम फेरीत शतकी खेळी केल्यानंतरही विराट कोहलीला पकडणं वाटतं तितकं सोपं नाही. चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान तर साखळी फेरीतच संपुष्टात आलं. त्यामुळे ऋतुराज गायकवाड त्याच्या जवळपास होता. पण आता तेही शक्य नाही. रियान पराग, ट्रेव्हिस हेड, संजू सॅमनस आणि सुनील नरीन यांना चमत्कार करावा लागेल.
विराट कोहलीने 15 सामन्यात 1 शतक आणि 5 अर्धशतकांच्या जोरावर 741 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड 583 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर राजस्थान रॉयल्सचा रियान पराग 567 धावांसह तिसऱ्या आणि सनरायझर्स हैदराबादचा ट्रेव्हिस हेड 533 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. या दोघांना विराट कोहलीच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी त्यांना क्वॉलिफायर 2 आणि अंतिम फेरीत तेवढीच चमकदार कामगिरी करावी लागेल. राजस्थान रॉयल्सच्या रियान परागला 175 धावांची गरज आहे. तर ट्रेव्हिस हेडला 208 धावांची गरज आहे. त्यामुळे विराट कोहलीला गाठायचं तर शतक ठोकावंच लागेल.
रियान परागला 175 धावांची गरज पाहता एका सामन्यात शतक आणि दुसऱ्या सामन्यात 75 धावा असं गणित सोडवावं लागेल. तसं पाहिलं तर हे गणित वाटतं तितकं सोपं नाही. शतकी खेळी करणं आणि प्लेऑफच्या सामन्यात जरा कठीणच वाटतं. पण एखादा चमत्कार घडला तर रियानला हे गणित सोडवता येईल. पण ट्रेव्हिस हेडचं गणित खूपच कठीण आहे. 208 धावांचं अंतर गाठायचं तर दोन शतकं ठोकावी लागतील. दोन शतकं सलग ठोकणं काही शक्य नाही. त्यामुळे राजस्थान विरुद्ध हैदराबाद सामन्यात हे दोन्ही फलंदाज गेले तर विराटच बेस्ट ठरेल.
विराट कोहलीने 2016 मध्ये यापूर्वी ऑरेंज कॅपचा मान मिळवला होता. विराट कोहलीने 16 सामन्यात 973 धावा केल्या होत्या. तसेच 7 अर्धशतकं आणि 4 शतकं ठोकली होती. आयपीएल इतिहासात विराट कोहलीचा हा सर्वोत्तम स्कोअर ठरला आहे. त्याच्या आसपासही कोणी पोहोचू शकलं नाही. आताही ऑरेंज कॅपचा मान विराट कोहली यालाच मिळेल यात शंका नाही. हैदराबाद-राजस्थान सामन्यानंतर हे चित्र आणखी स्पष्ट होईल.