विनोद कांबळीला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी का मिळाली नाही? लिलावापूर्वी नेमकं काय घडलं होतं?
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. शिवाजी पार्कात आचरेकर सरांचं स्मारक उभारण्यात आलं. तेव्हा विनोद कांबळीने हजेरी लावली होती. तेव्हापासून त्याच्याबाबत अनेक बातम्या समोर येत आहे. अशात विनोद कांबळीला आयपीएलमध्ये संधी न मिळण्याचं कारण काय? हा प्रश्नही क्रीडाप्रेमींचा चर्चेचा विषय आहे.
विनोद कांबळी हे 90च्या दशकातील क्रिकेटविश्वातील मोठं नाव.. सचिन तेंडुलकरसोबत विनोद कांबळीच्या नावाची चर्चा या काळात जोरात होती. पण सचिन आणि कांबळी यांच्यात त्यानंतर खूपच तफावत दिसून आली. सचिनने क्रिकेटविश्वात नावलौकीक मिळवला. तर विनोद कांबळी कोका कोला 2000 ट्राय सिरीजनंतर गायब झाला. विनोद कांबळीने 18 ऑक्टोबर 1991 साली पाकिस्तानविरुद्ध सारजाह कपमधून वनडे आगमन केलं होतं. तर 29 ऑक्टोबर 2000 साली सारजाहमध्ये शेवटचा सामना खेळला. विनोद कांबळीची कसोटी कारकिर्द फार मोठी नाही. 1993 ते 1995 या काळात कसोटी सामने खेळला. त्यानंतर त्याला कसोटी संघात स्थान मिळालं नाही. विनोद कांबळीने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. तर 2011 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. असं असताना विनोद कांबळीला 2008 आयपीएलमध्ये खेळण्याची संधी का मिळाली नाही असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. पहिल्या पर्वात चांगल्या अनुभवी खेळाडूंची गरज फ्रेंचायझींना होती. अशा स्थितीत विनोद कांबळीला संधी मिळू शकली असती. पण तसं न होण्याचं कारण काय? असे एक ना अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत.
विनोद कांबळी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकही टी20 सामना खेळला नाही. विनोद कांबळीला 2008 आयपीएल पर्वात खेळण्याची संधी होती. पण दुखापतीमुळे त्याला खेळता आलं नाही. त्यामुळे विनोद कांबळीच्या चाहत्यांना त्याला टी20 खेळताना पाहता आलं नाही. नडगीच्या दुखापतीमुळे (Shin Injury) त्याला आयपीएलमध्ये भाग घेता आला नाही. त्यामुळे विनोद कांबळीचं आयपीएल खेळण्याचं स्वप्न भंगलं. तसेच त्याला लिलावात भाग घेता आला नाही. त्यानंतर विनोद कांबळीने आयपीएलमध्ये बॅटिंग कन्सलटंन्ट म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 2020 मध्ये मीडियासी बोलताना ही बाब अधोरेखित केली होती.
‘फलंदाजी सल्लागार म्हणून कोणत्याही संघासाठी काम करण्याची माझी इच्छा आहे. माझ्या नडगीवरील ऑपरेशनमुळे मी धावू शकत नव्हतो आणि त्यामुळे 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या आवृत्तीत खेळू शकलो नाही. मी शेवटचं मुंबई रणजी संघातून बाहेर पडलो आणि निवृत्त झालो. माझ्या डाव्या पायात अजूनही रॉड आहे. तथापि, आयपीएलमधील एका संघासोबत फलंदाजी सल्लागार होण्याचे माझे स्वप्न आहे.’, असं विनोद कांबळीने 2020 मध्ये मीडियाशी बोलताना सांगितलं होतं.