World Cup 2023: नाणेफेक करताना बाबर नाणं का लपवत नाही? मिस्बाह उल हकचं उत्तर ऐकून तुम्हीही हसाल
World Cup 2023 : पाकिस्तानने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सुरुवातीचे दोन सामने जिंकले. पण दोन्ही दुबळे संघ असल्याने त्या विजयाला तसा काही अर्थ नव्हता. पण भारताने पराभूत करताच आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुंबई : पाकिस्तानने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दोन विजयांसह सुरुवात केली. पहिल्या सामन्यात नेदरलँड आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केलं. पण भारताविरुद्धच्या सामन्यात सर्वकाही उघडं पडलं. पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 191 धावांवर तंबूत परतला. भारताने हे आव्हान 3 गडी गमवून 30.3 षटकात पूर्ण केलं. या पराभवानंतर आता पाकिस्तान संघ आणि कर्णधार बाबर आझम याच्यावर टीका होत आहे. पाकिस्तानमध्ये या पराभवाचं गल्लीपासून टीव्हीपर्यंत मंथन सुरु आहे. माजी क्रिकेटपटूनं पाकिस्तानी संघावर जोरदार टीकास्त्र सोडलं. पाकिस्तानच्या यूट्यूब शो ए स्पोर्ट्सवर वसीम अक्रम, मिस्बाह उल हक, शोएब अख्तर यांनी खेळाडूंवर टीकेची झोड उठवली. या कार्यक्रमादरम्यान एका दर्शकाने विचित्र प्रश्न विचारला त्यावर मिस्बाह उल हक याने दिलेलं उत्तर ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
बाबर नाणेफेकीवेळी नाणं का लपवत नाही?
वसीम अक्रम याने कार्यक्रमादरम्यान आलेला प्रश्न वाचला आणि उत्तकर दिलं. प्रश्न असा होता की, ‘बाबर आझम टॉस करताना नाणं का लपवत नाही?’ यानंतर स्टुडिओत बसलेले शोएब मलिक, मोईन खान आणि मिस्बाह उल हक हसायला लागले. अक्रमने त्यावर सांगितलं की, ‘असं काही नसतं. मैदानात खूप आवाज असतो. त्या स्थितीत वर हेड आहे की टेल हे बघणं कठीण असतं.’
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) October 16, 2023
अक्रमने उत्तर दिल्यानंतर मिस्बाह उल हकने त्यात एडिशन टाकलं. त्यामुळे उपस्थितांना आश्चर्य वाटलं. मिस्बाह उल हकने अक्रमला सांगितलं की, ‘सामान्यपणे मोठं नाणं असतं. त्यामुळे वर जी बाजू असेल तीच येते.’ यावर अक्रमने अशी प्रतिक्रिया दिली की उपस्थितांना हसू आवरलं नाही. मिस्बाहची म्हणणं ऐकून सर्वजण खदखदून हसले. दरम्यान, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला आता कठीण संघांचा सामना करायचा आहे. यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी या संघांना पराभूत करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पाकिस्तानची पुढची वाट वाटते तितकी सोपी नाही, हे देखील खरं आहे.