Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणे याला विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत कर्णधारपद मिळण्याची शक्यता
Ajinkya Rahane Captaincy WI VS IND Test Series | टीम इंडिया वेस्टइंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत अजिंक्य रहाणे याला कर्णधारपदाची जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे.
मुंबई | अजिंक्य रहाणे, टीम इंडियाचा अनुभवी, माजी कर्णधार, उपकर्णधार आणि अनुभवी फलंदाज. रहाणेचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यानिमित्ताने टीम इंडियात जवळपास दीड वर्षांनी कमबॅक झालं. रहाणेने आपल्याला निवडीचा निर्णय योग्य ठरवत टीम इंडियाची लाज राखली. रहाणेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये केलेल्या कामगिरीमुळे टीम इंडियावर फॉलोऑनचा धोका टळला. तर त्यानंतर चौथ्या दिवशी होणाऱ्या पराभवाची नामुष्कीही रहाणेमुळे टळली. रहाणेचं 17 महिन्यांनी कमबॅक झालं असलं तरी त्याच्या कामगिरीवर कणभरही फरक पडलेला नाही.
टीम इंडियाकडून रहाणेचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी घोर निराशा केली. याचाच परिणाम म्हणून टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गदेने हुलकावणी दिली. टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. आता टीम इंडिया विश्रांतीवर आहे. टीम इंडिया या विश्रांतीनंतर वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. या दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होत आहे.
रहाणे याला वेस्टइंडिज विरुद्धच्या 2 टेस्ट मॅचसाठी कर्णधार करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. टीम इंडियाला wtc final मध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे रोहितच्या नेतृत्वावर टीका करण्यात आली. तसेच रोहितकडून कर्णधारपदावरुन काढण्याची मागणीही केली गेली.
रोहितसोबत चेतेश्वर पुजारा आणि टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध घोर निराशा केली. त्यामुळे बीसीसीआय या खेळाडूं विरुद्ध कारवाईचा बडगा उचलणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यानुसार निवड समिती या कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिकेतून रोहित, पुजारा आणि इतर खेळाडूंना वगळू शकते.
अशा परिस्थितीत निवड समिती अजिंक्य रहाणे याला पुन्हा एकदा संधी देऊन थेट कर्णधारपदाची सूत्र देऊ शकते. रहाणेला कर्णधारपदाचा अनुभव आहे. याच रहाणेने टीम इंडियाला विराट कोहली याच्या अनुपस्थितीत 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकून दिली होती. टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने ती मालिका जिंकली होती.
तेव्हा टीम इंडियाच्या गोटात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणाऱ्या युवा खेळाडूंची संख्या मोठी होती. यामध्ये टी नटराजन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर हे आणि असे बरेच खेळाडू होते. रहाणेने या खेळाडूंना विश्वासात घेऊन, त्यांना खेळण्याचं स्वातंत्र्य देऊन मिशन फत्ते करुन दाखवलं. त्यामुळे आता रहाणेला कर्णधारपद मिळण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेनिमित्ताने 2023-2025 या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप मोहिमेची सुरुवात करणार आहे. त्यामुळे 2 वेळा ऐन क्षणी माती केल्यावर यंदा तिसऱ्या वेळेपासून सावध आणि दक्ष राहण्याचा विचार बीसीसीआय करु शकते. त्यामुळे आता निवड समिती नक्की काय निर्णय घेते, याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचा लक्ष असणार आहे.