WI vs IND 2nd Test | कोहलीची शतकी खेळी, टीम इंडियाच्या पहिल्या डावात ‘विराट’ धावा
West Indies vs India 2nd Test | टीम इंडियाने पहिल्या डावात विराट कोहली याच्या शतकाच्या जोरावर 400 पार मजल मारली आहे.
त्रिनिदाद | वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव आटोपला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 128 ओव्हरमध्ये 438 धावा केल्या. टीम इंडियाकडून विराट कोहली याने सर्वाधिक 121 धावांची शतकी खेळी केली. तर चौघांनी अर्धशतक झळकावलं. तर विंडिजकडून दोघांनी प्रत्येकी 3, एकाने 2 आणि एकाने 1 विकेट घेतली. विराट कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 500 व्या सामन्यात 180 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं.
विराटच्या कसोटी कारकीर्दीतील 29 वं तर एकूण 76 वं शतक ठरलं. मात्र शतक ठोकल्यानंतर विराट 21 धावानंतर रन आऊट झाला. विराट 206 बॉलमध्ये 11 फोरच्या मदतीने 121 रन्स केल्या. कॅप्टन रोहित शर्मा याने 80 रन्स केल्या. रविंद्र जडेजाने 61 धावांची अर्धशतकी खेळी केली. यशस्वी जयस्वाल याने 57 आणि आर अश्विन याने 56 धावा जोडल्या. इशान किशन याने 25, शुबमन गिल 10, अजिंक्य रहाणे 8, आणि जयदेव उनाडकट याने 7 धावांचं योगदान दिलं. मोहम्मद सिराज भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. तर मुकेश कुमार 0* नाबाद राहिला.
विंडिजकडून केमार रोच आणि जोमेल वॉरिकन या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. जेसन होल्डर याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर शॅनन गॅब्रिएल याने एकमेव विकेट घेतली.
शतकी भागीदारी
दरम्यान टीम इंडियाकडून पहिल्या डावात 2 शतकी भागीदारी करण्यात आल्या. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या ओपनिंग जोडीने 139 धावांची पार्टनरशीप केली. तर त्यानंतर पाचव्या विकेटसाठी 159 रन्सची भागीदारी झाली. विराट कोहली आणि रविंद्र जडेजा या दोघांनी ही पार्टनरशीप केली. टीम इंडियाने चांगल्या सुरुवातीनंतर झटपट 4 विकेट्स गमावले. त्यामुळे कुठेतरी मोठ्या भागीदारीची गरज होती. महत्वाच्या क्षणी जडेजा आणि विराटने मैदानात उभे राहत भारताला मजबूत स्थितीत पोहचवण्यात महत्वाची भूमिका बजावली.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंदरपॉल, जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन आणि शॅनन गॅब्रिएल.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.