Yashasvi Jaiswal | दुसऱ्याच सामन्यात 14 वर्षांआधीचा रेकॉर्ड उद्धवस्त, विंडिज विरुद्ध यशस्वी जयस्वाल याची ऐतिहासक कामगिरी
Yashasvi Jaiswal | यशस्वी जयस्वाल याने वेस्ट इंडिज विरुद्ध चौथ्या टी 20 सामन्यात टीम इंडियासाठी विजयी खेळी केली.
फ्लोरिडा | टीम इंडियाने वेस्ट इंडिज क्रिकेट टीमवर चौथ्या टी 20 सामन्यात 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. विंडिजने टीम इंडियाला विजयासाठी 179 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाने हे आव्हान 1 विकेट गमावून 17 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल ही सलामी जोडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. या दोघांनी विजय मिळवून दिला. या दोघांनी 165 धावांची विक्रमी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी अर्धशतकं झळकावली. मात्र यशस्वीसाठी हे अर्धशतक खास ठरलं.
यशस्वीचं हे टी 20 क्रिकेटमधील पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. यशस्वीने यासह टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याचा 14 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक केला. यशस्वी टी 20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून अर्धशतक ठोकणारा सर्वात युवा सलामीवीर ठरला. यशस्वीने वयाच्या 21 वर्ष 227 व्या दिवशी हे अर्धशतक केलं. तर रोहित शर्मा याने वयाच्या 22 वर्ष 41 व्या दिवशी टी 20 मध्ये अर्धशतक ठोकत युवा फलंदाज म्हणून कीर्तीमान केला होता. रोहितने आयर्लंड विरुद्ध 2009 मध्ये हा कारनामा केला होता.
रोहितचा तो रेकॉर्ड अजून अबाधित
यशस्वीने रोहितचा रेकॉर्ड ब्रेक केला. मात्र रोहितचा एक विक्रम अजूनही कायम आहे. रोहित टीम इंडियाकडून सर्वात कमी वयात अर्धशतक करणारा पहिलाच फलंदाज आहे. रोहितने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध 50 धावा केल्या होत्या. तेव्हा रोहितचं वय हे फक्त 20 वर्ष 143 दिवस इतकं होतं.
यशस्वीची धमाकेदार कामगिरी
Youngest Indian opener to score a fifty:
Tests – Prithvi Shaw.
ODIs – Virat Kohli.
T20is – Yashasvi Jaiswal. pic.twitter.com/7Y6j5Uxeom
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 12, 2023
शुबमन-‘यशस्वी’ सलामी जोडी
दरम्यान चौथ्या टीम सामन्यात शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी 165 धावांची भागीदारी करत विक्रम केला. शुबमन आणि यशस्वी या सलामी जोडीनी टी 20 मध्ये रोहित-केएल राहुल या ओपनिंग जोडीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. केएल राहुल आणि रोहित शर्मा या दोघांनी 2017 मध्ये श्रीलंका विरुद्ध 165 रन्सची पार्टनरशीप केली होती.
टीम इंडियाकडून मालिकेत बरोबरी
शुबमन गिल याने चौथ्या टी 20 सामन्यात 47 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 चौकारांच्या मदतीने 77 धावांची खेळी केली. तर यशस्वी जयस्वाल 51 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 11 चौकारांच्या मदतीने 84 धावांवर नाबाद राहिला. तर तिलक वर्मा याने नॉट आऊट 7 रन्स केल्या. टीम इंडियाने या चौथ्या सामन्यातील विजयासह मालिकेत 2-2 ने बरोबरी केली. आता पाचवा आणि अंतिम सामना हा 13 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे.
वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), कायले मेयर्स, ब्रँडन किंग, शाय होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, ओडीयन स्मिथ, अकील होसैन आणि ओबेड मॅकॉय.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार) यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार.