WI vd IND | विराट कोहली याचा खास रेकॉर्ड धोक्यात, तिलक वर्मा करणार काम तमाम!
West Indies vs India Tilak Varma | तिलक वर्मा याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेतून इंटरनॅशनल डेब्यू केलं. तिलकला पहिल्याच सीरिजमध्ये रेकॉर्ड करण्याची संधी आहे.
फ्लोरिडा | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. विंडिजने या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात विजय मिळलत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. तर तिसऱ्या आणि ‘करो मरो’ च्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत मालिकेतील आव्हान कायम ठेवलं. त्यामुळे टीम इंडियाची मालिकेतील स्थिती 1-2 अशी आहे. मालिकेतील चौथा सामना हा 12 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. या चौथ्या मॅचमध्ये युवा ओपनर बॅट्समन तिलक वर्मा याला मोठा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.
तिलक वर्मा याने या टी 20 मालिकेत आपल्या कामगिरीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिलक वर्मा याने या मालिकेतील पहिल्या 3 सामन्यात अनुक्रमे 39, 51 आणि 49 धावा केल्या आहेत. तिलकने अशीच कामगिरी उर्वरित 2 सामन्यात केल्यास त्याला विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. तिलकच्या नावावर आतापर्यंत एकूण 3 सामन्यात 139 रन्स आहेत. तिलकला विराटचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी आणखी 93 धावांची गरज आहे.
नक्की रेकॉर्ड काय?
टीम इंडियाकडून 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा विराट कोहली याच्या नावावर आहे. विराट कोहली याने 5 टी 20 मॅचच्या सीरिजमध्ये 231 धावा केल्या आहेत. विराटने ही कामगिरी इंग्लंड विरुद्ध 2021 मध्ये केली होती. त्यामुळे आता तिलक 2 सामन्यांमध्ये 93 धावा करुन विराटला पछाडणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.
दरम्यान तिसऱ्या सामन्यात तिलकला अर्धशतकासाठी 1 धावेची गरज होती. तर टीम इंडियाला विजयासाठी 2 धावा हव्या होत्या. तेव्हा कॅप्टन हार्दिक पंड्या याने सिक्स मारत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. मात्र यामुळे तिलक वर्मा याचं अर्धशतक होऊ शकलं नाही, त्यामुळे तो 49 धावांवर नाबाद राहिला. यामुळे हार्दिकला नेटकरी नको नको ते म्हणाले. “हार्दिक स्वार्थी आहे.”, “हार्दिकला सिक्स मारण्याची गरज नव्हती.”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या होत्या.
टी 20 सीरिजसाठी वेस्ट इंडिज टीम | रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), कायले मेयर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ओशाने थॉमस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ.
विंडिज विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.