WI vs IND 2023 | विंडिज दौऱ्याआधी टीम इंडियाला झटका, मोठ्या खेळाडूला दुखापत
Team India Tour Of West Indies 2023 | टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून होत आहे. कसोटी मालिकेने या दौऱ्याची सुरुवात तर टी 20 मालिकेने शेवट होणार आहे.
मुंबई | बीसीसीआयने वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेनंतर बुधवारी 5 जुलै रोजी टी 20 मालिकेसाठी 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली. या टी 20 मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी फलंदाजांना विश्रांती देण्यात आली आहे. तर युवा खेळाडूंना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे. यामध्ये तिलक वर्मा आणि यशस्वी जयस्वाल या दोघांची पहिल्यांदाच एन्ट्री झाली आहे. हार्दिक पंड्या विंडिज विरुद्ध कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र या विंडिज दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे.
विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियात आवेश खान याचा समावेश करण्यात आला आहे. या आवेश खानला दुखापत झाली आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेत वेस्ट झोन विरुद्ध सेंट्रल झोन या सामन्यात आवेशला दुखापत झाली. आवेश खान सेंट्रल झोन टीमकडून खेळतोय. तर रिंकू वेस्ट झोन टीमचं प्रतिनिधित्व करतोय. या सामन्यातील पहिल्या दिवशी आवेश रिंकूला जोरात धडकला. आवेश या धडकेनंतर दुसऱ्या दिवशी फिल्डिंगसाठी येऊ शकला नाही.
वेस्ट झोन विरुद्ध सेंट्रल झोन यांच्यात पहिला सेमी फायनल सामना हा बंगळुरुतील अलूर येथे खेळवण्यात येत आहे. सामन्यातील पहिल्या दिवशी म्हणजेच 5 जुलै रोजी फिल्डिंग करताना आवेश जोरात रिंकूला जाऊन धडकला. या धडकेमुळे आवेशच्या खांद्याला दुखापत झाली. आवेशची दुखापत गंभीर स्वरुपाची आहे की नाही, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र आवेशला झालेली दुखापत जर गंभीर असेल, तर त्याला टी 20 मालिकेतून बाहेर पडावं लागू शकतं.
टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण
दरम्यान टीम इंडियाच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागलंय. जसप्रीत बुमराह हा गेल्या वर्षभरापासून दुखापतीमुळे बाहेर आहे. रिंकू सिंह अपघातामुळे 6 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. तर केएल राहुल एनसीएत दुखापतीवर मेहनत घेतोय. त्यात आता आवेशची भर पडलीय. आवेशला झालेली दुखापत ही टीम इंडियासाठी चिंताजनक नसावी, अशी प्रार्थना क्रिकेट चाहत्यांकडून केली जात आहे.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या दौऱ्याबाबत महत्वाची माहिती
टीम इंडिया विंडिज दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. टीम इंडियाच्या या विंडिज दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून होणार आहे. कसोटीनंतर 3 वनडे आणि 5 टी 20 सामन्यांची मालिका उभयसंघात पार पडणार आहे.
टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.