WI vs IND | विंडिज दौऱ्यात ‘या’ खेळाडूकडे टीम इंडियाचं कर्णधारपद!
Team India Tour Of West Indies 2023 | टीम इंडिया जुलै महिन्यात वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया विरुद्ध विंडिज यांच्यात टेस्ट, वनडे आणि टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे.
मुंबई | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर टीम इंडियाचे खेळाडू सध्या निवांत आहेत. क्रिकेट टीम इंडिया आता जुलै महिन्यात वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहै. या दौऱ्यात टीम इंडिया विंडिज विरुद्ध टेस्ट, वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तर 13 ऑगस्टला या दौऱ्याची सांगता होईल. बीसीसीआयने या दौऱ्याचं वेळापत्रकही जाहीर केलंय.
विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. या विंडिज दौऱ्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील पराभवानंतर टीम इंडियात बदल होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे टेस्ट सीरिजमध्ये कर्णधारपदाची सूत्र कोणत्या खेळाडूला मिळणार, याबाबतही चर्चा रंगली आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
वर्कलोडमुळे रोहित शर्मा याला आगामी विंडिज दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे कसोटी मालिकेत रोहितच्या जागी अजिंक्य रहाणे याला नेतृत्वाची संधी देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र त्याआधी रोहित खेळणार की नाही, हे त्याला विचारण्यात येणार असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र या दरम्यान अपडेट आलीय.
इनसाईड स्पोर्ट्सनुसार, रोहित शर्माच कसोटी मालिकेत कर्णधारपद सांभाळणार असल्याचं म्हटलं जातंय. “रोहित फिट आहे. तसेच तो सिलेक्शनसाठी उपलब्ध आहे. रोहितकडे विश्रांतीसाठी वेळ आहे. त्यामुळे वर्कलोड कमिटी चिंतेत नाही. त्यामुळे रोहित विंडिज विरुद्ध कसोटी मालिकेत नेतृत्व सांभाळेल”, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला दिली.
रोहितच्या कामगिरीबाबत काय?
बीसीसीआय अधिकाऱ्याने रोहितच्या कामगिरीबाबतही प्रतिक्रिया दिली. “रोहितने आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये धावा केल्या नाहीत. मात्र गेल्या काही महिन्यात रोहितने चांगली कामगिरी केलीय. रोहितने नागपूरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक ठोकलं होतं. रोहित आपल्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे. फक्त कामगिरीच्या आधारावर रोहितवर टीका करणं योग्य नाही”, असंही या अधिकाऱ्याने म्हटलं.
टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याचं वेळापत्रक
कसोटी मालिका
पहिला सामना – 12 ते 16 जुलै
दुसरा सामना – 20-24 जुलै
वनडे सीरिज
पहिला सामना – 27 जुलै
दुसरा सामना 29 जुलै
तिसरा सामना 1 ऑगस्ट
टी 20 सीरिज
पहिला सामना – 4 ऑगस्ट
दुसरा सामना – 6 ऑगस्ट
तिसरा सामना – 8 ऑगस्ट
चौथ्या सामना – 12 ऑगस्ट
पाचवा सामना – 13 ऑगस्ट.
दरम्यान अजून विंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आलेलं नाही. लवकरच या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात येणार आहे. विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.