Virat Kohli | विराट कोहली याची पुन्हा कर्णधारपदी निवड? क्रिकेट विश्वात खळबळ
Team India Test Captaincy | विराट कोहली याने टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदाचा जानेवारी 2022 मध्ये राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्मा याची नियुक्ती करण्यात आली.
मुंबई | टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याला आता 48 तासांपेक्षा कमी वेळ राहिलाय. या विंडिज दौऱ्याची सुरुवात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. पहिला कसोटी सामना हा 12 जूलैपासून खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यासारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं. या पराभवानंतर रोहित शर्मा याची कर्णधारपदावरुन उचबांगडी करण्यात यावी, अशी मागणी काही क्रिकेट चाहत्यांकडून करण्यात येत होती. आता यावर टीम इंडियाच्या माजी चीफ सिलेक्टरने मोठं विधान केलं आहे.
टीम इंडियाचे माजी चीफ सिलेक्टर एमएसके प्रसाद यांनी विराट कोहली याला कर्णधारपदी फेरनियुक्त करण्यात यावं, या मागणीला पाठिंबा दिला आहे. एमएसके प्रसाद यांच्यानुसार, विराटला टीम इंडियाच्या कसोटी संघाचा कर्णधार करायला हवं. जर अजिंक्य रहाणे याला पुन्हा उपकर्णधार करता येतं, तर विराटला का नाही कर्णधार करता येत, असं प्रसाद यांनी म्हटलं. अजिंक्य रहाणे याच्याकडे वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रहाणेने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये टीम इंडियाची लाज राखली होती.
एमएसके प्रसाद काय म्हणाले?
प्रसाद यांना रोहितनंतर कर्णधारपदी कोणत्या युवा खेळाडूची नियुक्ती होऊ शकते, असा प्रश्न विचारण्यात आले. यावर एमएसके प्रसाद म्हणाले “विराट का नाही?”. “जर अजिंक्य रहाणे कमबॅक करुन उपकर्णधार होऊ शकतो तर विराट कोहली का नाही? विराटचा कर्णधारपदाबाबत काय विचार आहे, हे मला माहित नाही. मात्र विराट एक पर्याय आहे”, असं एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केलं. एमएसके प्रसाद यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी कोहलीबाबत विधान केलं.
कर्णधार विराट कोहलीची आकडेवारी
कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर जबरदस्त रेकॉर्ड आहे. विराटच्या नावावर कर्णधार म्हणून आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला सर्वाधिक सामने जिंकून देण्याचा विक्रम आहे. विराट कोहली याच्या नेतृत्वात टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलीय. विराटने एकूण 68 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलंय. या 68 पैकी 40 सामन्यात विराटने टीम इंडियाला विजय मिळवून दिलाय. तर 17 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलंय.