WI vs IND 1st Test | पावसामुळे वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिली टेस्ट रद्द?
West Indies vs Team India 1st Test Weather Forecast | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला कसोटी सामना हा 12 ते 16 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
डोमिनिका | टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर विश्रांतीवर होती. या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया आता वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया या दौऱ्यात विंडिज विरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. पहिला कसोटी सामन्याला येत्या 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. विशेष बाब म्हणजे टीम इंडिया या कसोटी मालिकेतून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 मोहिमेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही कसोटी मालिका महत्वाची आहे.
टीम इंडियाने पहिल्या कसोटीसाठी नेट्समध्ये जोरदार सराव केलाय. दोन्ही संघांच्या खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांना उत्सूकता लागून राहिलीय. पहिला सामना हा डोमिनिका इथील विंडसर पार्क इथे खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. या पहिल्या सामन्यावर पावसाचं सावट आहे.
सामना रद्द होणार?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या पहिल्या सामन्यात पाऊस होऊ शकतो. सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाऊस होण्याचा अंदाज आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी हवामान कोरडे असेल. तर चौथ्या आणि पाचव्या दिवशी पुन्हा पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होऊ शकतो.
टीम इंडियाची विंडिज विरुद्धची कामगिरी
दरम्यान टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये 21 वर्षांपासून अजिंक्य आहे. टीम इंडियाला विंडिजने 2002 मध्ये अखेरीस कसोटी मालिकेत पराभूत केलं होतं. तेव्हापासून ते आतापर्यंत उभयसंघात एकूण 8 कसोटी मालिका खेळवण्यात आल्या आहेत. यापैकी 4 भारतात आणि 4 वेस्ट इंडिजमध्ये पार पडल्या. या सर्वच्या सर्व म्हणजेच 8 मालिकांमध्ये टीम इंडिया विजयी राहिली आहे.
टीम इंडियाची विंडिजमधील कामगिरी
दरम्यान टीम इंडियाने आतापर्यंत विंडिजमध्ये एकूण 51 कसोटी सामने खेळले आहेत. या 51 पैकी 9 सामन्यात टीम इंडियाचा विजय झालाय. तर टीम इंडियाला 16 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलंय. तर 26 सामने हे अनिर्णित राहिलेत.
विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जड़ेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट आणि नवदीप सैनी.
टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी विंडिज संघ
क्रॅग ब्रॅथवेट (कॅप्टन), जर्मेन ब्लैकवुड (उपकर्णधार), एलिक अथानाजे, टॅगेनारिन चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गेब्रियल, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, किर्क मॅकेंजी, रेमन रीफर, केमार रोच आणि जोमेल वारिकन