विंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना हा अनिर्णित राहिला आहे. विंडिजला सामन्यातील पाचव्या दिवशी विजयासाठी 72 ओव्हरमध्ये 298 धावांची गरज होती. विंडिजला 5 विकेट्स गमावून 201 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि सामना अनिर्णित राहिला. उभयसंघातील कसोटी अनिर्णित राहण्यासह गेल्या 28 सामन्यांची मालिका खंडित झाली. दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराज याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. केशवने 12 वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक केला.
उभयसंघातील सलामीचा सामना हा 7 ते 11 ऑगस्ट दरम्यान खेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात कॅप्टन टेम्बा बावुमा याच्या सर्वाधिक 86 धावांच्या जोरावर 357 पर्यंत मजल मारली. विंडिजकडून जोमेल वॉरिकन आणि जेडेन सील्स या दोघांनी सर्वाधिक अनुक्रमे 4 आणि 7 विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या 357 च्या प्रत्युत्तरात विंडिजचा पहिला डाव हा 233 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेला अशाप्रकारे 124 धावांची निर्णायक आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज याने 40 ओव्हरमध्ये 76 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. केशवने यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ओव्हर टाकण्याचा 12 वर्षांआधीचा विक्रम मोडीत काढला. पाकिस्तानच्या अब्दुर रहमान याने 2012 साली इंग्लंड विरुद्ध 37 ओव्हर टाकल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेने 124 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेने दुसरा डाव 3 बाद 173 धावांवर घोषित केला. विंडिजला अशाप्रकारे विजयासाठी 298 धावांचं आव्हान मिळालं. दक्षिण आफ्रिकेने विंडिजला दुसऱ्या डावात गुंडाळण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नांना काही यश आलं नाही. ॲलिक अथानाझे याने चिवट झुंज देत विंडिजची लाज राखली. ॲलिक अथानाझे याने 9 चौकारांसह 116 बॉलमध्ये 92 धावांची झुंजार खेळी केली. तर केशव महाराज याने दुसऱ्या डावातही 4 विकेट्स घेतल्या. केशवने 26.2 ओव्हरमध्ये 88 धावा देत चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मात्र त्यानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या इतर कोणत्याही गोलंदाजाला काही विशेष करता आलं नाही. परिणामी सामना अनिर्णित राहिला. जुलै 2023 पासून झालेल्या 28 सामन्यांनंतर हा पहिला सामना अनिर्णित राहिला. तसेच 2024 मध्ये अनिर्णित राहिलेला हा पहिला सामना ठरला.
वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन: क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकील लुईस, केसी कार्टी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), केमार रोच, जेडेन सील्स, गुडाकेश मोटी आणि जोमेल वॉरिकन.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, रायन रिकेल्टन, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी.