WI vs SA : कसोटीनंतर टी20 मालिकेत लागणार वेस्ट इंडिजचा कस, जाणून घ्या हेड टू हेड
वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका नुकतीच पार पडली. ही मालिका दक्षिण अफ्रिकेने 1-0 ने जिंकली. पहिला सामना ड्रॉ झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजला 40 धावांनी मात दिली. आता दोन्ही संघ टी20 मालिकेसाठी सज्ज झाले आहेत.
दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटीनंतर तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. पहिला टी20 सामना 23 ऑगस्टला, दुसरा टी20 सामना 25 ऑगस्टला, तर तिसरा टी20 सामना 27 ऑगस्टला होणार आहे. या सामन्यांच आयोजन त्रिनिदाद टोबॅगो येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीच्या मैदानात होणार आहे. कसोटी मालिका गमावल्यानंतर वेस्ट इंडिजवर टी20 मालिका जिंकण्याचं दडपण असणार आहे. या मालिकेपूर्वी दक्षिण अफ्रिकेने आपला संघ जाहीर केला होता. आता वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. या दोन्ही संघांची आकडेवारी पाहिली तर दक्षिण अफ्रिकेचं पारडं जड आहे. दोन्ही संघ 23 वेळा आमनेसामने आले आहेत. यात 12 वेळा दक्षिण अफ्रिकेने तर 11 वेळा वेस्ट इंडिजने विजय मिळवला आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात एक विजय अधिक असला तरी तुल्यबल सामना होणार यात शंका नाही. टी20 वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ पाच वेळा भिडले आहेत. यात 4 वेळा दक्षिण अफ्रिकेने, तर एकदा वेस्ट इंडिजने विजय मिळवला आहे.
वेस्ट इंडिजच्या 15 सदस्यीय संघाचं नेतृत्व रोव्हमॅन पॉवेल करणार आहे. पण या संघात अष्टपैलू आंद्रे रसेल नसेल. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला आराम देण्यात आला आहे. अल्झारी जोसेफही मालिकेसाठी उपलब्ध नसेल. तर दुखापतग्रस्त ब्रँडन किंगही तीन सामन्यांच्या मालिकेत नसेल. त्यामुळे दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिज संघावर दडपण असेल. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिका संघातूनही काही दिग्गज खेळाडूंना डावललं आहे. तसेच दोन अपकॅप्ड खेळाडूंना स्थान दिलं आहे.
दोन्ही संघांचे खेळाडू
वेस्ट इंडिज टी20 संघ: रोवमन पॉवेल (कर्णधार), रोस्टन चेस, अलिक अथानाझ, जॉन्सन चार्ल्स, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, फॅबियन ऍलन, शाई होप, अकील हुसेन, शमर जोसेफ, ओबेद मॅककॉय, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, शेरफर्ड रोमर शेफर्ड.
दक्षिण आफ्रिका टी20 संघ: एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्जर, डोनोव्हान फरेरा, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेन्ड्रिक्स, पॅट्रिक क्रुगर, क्वेना माफाका, व्हियान मुल्डर, लुंगी एनगिडी, रायन रिकेल्टन, जेसन स्मिथ, ट्रायस्टॅन, रा. डुसेन, लिझार्ड विल्यम्स.