मोठा निर्णय! संघात पुनरागमन करताच इशान किशनच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ
दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडून आल्यानंतर इशान किशनचे तारे फिरले. तेव्हापासून आतापर्यंत संघात पुनरागमनासाठी त्याचा विचारच केला जात नाही. बीसीसीआयच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. असं असताना इशान किशनने पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली आहे.
विकेटकीपर आणि डावखुरा फलंदाज इशान किशन मागच्या वर्षापासून टीम इंडियात नाही. दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडला आणि त्यानंतर त्याला टीम इंडियात संधी मिळाली नाही. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतूनही डावलण्यात आलं होतं. त्यामुळे इशान किशनने भले काही सांगितलं नाही पण नक्कीच हताश झाला असावा. त्यात बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून डावलल्याचं दु:ख ते वेगळंच होतं. त्यामुळे इशान किशनने बीसीसीआयचं म्हणणं ऐकत देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून इशान किशन झारखंड संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणार आहे. इतकंच काय तर त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. बुच्ची बाबू स्पर्धेत इशान किशन खेळणार आहे. ही स्पर्धा 15 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. उपांत्य फेरीचा सामना 2 सप्टेंबर, तर 8 सप्टेंबरला अंतिम सामना असणार आहे. ही चार दिवसीय क्रिकेट स्पर्धा असून यात 12 संघ भाग घेणार आहेत.
इशान किशनच्या नेतृत्वात झारखंडचा संघ पहिला सामना मध्य प्रदेशशी खेळणार आहे. या संघाविरुद्ध देशांतर्गत क्रिकेटमध्ये इशान किशनने चांगली कामगिरी केली होती. मध्य प्रदेशविरुद्ध 94 चेंडूत 173 धावा केल्या होत्या. यात 11 षटकार ठोकले होते. आता टीम इंडियाचे दरवाजे खुले होण्यासाठी इशान किशनला या स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. जर इशान किशनचा बॅट चालली तर मग इशान किशनला पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होईल.
बुच्ची बाबू स्पर्धेत एकूण चार गट आहेत. ही संपूर्ण स्पर्धा तामिळनाडूमध्ये होणार आहे. या स्पर्धेत 10 संघ बाहेरील राज्यातील असून तामिळनाडूचे दोन संघ आहेत. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन प्रेसिडेंट इलेव्हन आणि टीएनसीए इलेव्हन असे दोन संघ असणार आहे. अ गटात झारखंड, मध्य प्रदेश आणि हैदराबादचे संघ आहेत. ब गटात रेल्वे, गुजरात आणि तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन प्रेसिडेंट इलेव्हन संघ आहेत. क गटात मुंबई, हरियाणा आणि टीएनसीए इलेव्हन खेळतील. ड गटात जम्मू-काश्मीर, छत्तीसगड आणि बडोदा संघ असतील.
ही स्पर्धा तामिळनाडुतील नाथम, कोईम्बतूर आणि तिरुनेलवेली येथे होणार आहेत. ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला 3 लाख रुपये, तर उपविजेत्या संघाला 2 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल. इशान किशन, सरफराज खान, सूर्यकुमार यादव अशी मोठी नावे या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत.