इशान किशनचे अच्छे दिन! या मालिकेपासून टीम इंडियात पुनरागमन होण्याची शक्यता
विकेटकीपर फलंदाज इशान किशन बुची बाबू स्पर्धेतून झारखंड संघाचं कर्णधारपद भूषवित आहे. देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करत इशान किशन पुन्हा एकदा टीम इंडियाच्या वेशीवर उभा राहिला आहे. या स्पर्धेत इशान किशनने शतकी खेळी करत टीम इंडियाच्या दिशेने पाऊल टाकलं आहे.
विकेटकीपर आणि डावखुरा फलंदाज इशान किशन याचे तारे गेल्या काही दिवसात फिरले आहे. दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडल्यानंतर सर्वकाही ट्रॅकवरून उतरलं आहे. बीसीसीआयच्या सेंट्रल काँट्रॅक्टमधून वगळलं गेलं. तसेच टीम इंडियात पुनरागमन करणं कठीण झालं. बीसीसीआयने वारंवार देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सूचना करूनही कानडोळा केल्याचा त्याला फटका बसला. 2024 या वर्षात इशान किशन टीम इंडियासाठी एकही सामना खेळलेला नाही. अशा सर्व उलथापालथी होत असताना इशान किशनला उपरती झाली आणि देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सज्ज झाला. देशांतर्गत क्रिकेटमधील बुची बाबू स्पर्धेत झारखंडचा कर्णधार म्हणून उतरला. मध्य प्रदेशविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात इशान किशनची बॅट चांगलीच तळपली. त्याने 114 चेंडूत 107 धावांची खेळी केली. यात 10 षटकार आणि 5 चौकार मारले. तर दुसऱ्या डावात 58 चेंडूत 41 धावा केल्या आणि नाबद होत तंबूत परतला. यावेळी त्याने आपल्या खेळीने संघाला विजय मिळवून दिला.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी इशान किशनने धावा करणं हे चांगले संकेत आहेत. आता इशान किशन दुलीप ट्रॉफीतही खेळणार आहे. म्हणजेच निवड समिती त्याच्या नावाचा विचार करण्यास सकारात्मक दिसत आहे. फक्त इशान किशनला आपला फॉर्म कायम ठेवणं गरजेचं आहे. तर आणि तरच टीम इंडियात पुनरागमन होऊ शकतं. बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया टेस्ट व्यतिरिक्त टी20 मालिकाही खेळणार आहे. त्यामुळे इशान किशनला पुनरागमन करण्याची नामी संधी आहे.
इशान किशनने दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंना सूचना केल्या. पण या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून इशान किशन थेट आयपीएलमध्ये उतरला. त्यात इशान किशनची बॅट हवी तशी चालली नाही. मुंबई इंडियन्स संघाची आयपीएल स्पर्धेत पुरती वाट लागली. त्याचा फटका इशानला बसला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी त्याच्या नावाचा विचार झाला नाही. अखेर इशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा विचार केला आणि आता सर्वकाही ठीक होईल असं वाटत आहे.