चेन्नई सुपर किंग्स विरूद्धच्या पहिल्याच सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार? कारण…
आयपीएल 2025 स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सशी 23 मार्चला होणार आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांची गैरहजेरी असणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स या सामन्यात कोणत्या खेळाडूंना संधी देईल याची उत्सुकता आहे.

आयपीएल स्पर्धा २२ मार्चपासून सुरु होणार आहे. २३ मार्चला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे. दोन्ही संघांचं आयपीएल स्पर्धेत वर्चस्व राहिलं आहे. दोन्ही संघानी पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स संघात उलथापालथ झाली आहे. मागच्या पर्वाचा फटका हार्दिक पांड्याला पहिल्याच सामन्यात बसला आहे. स्लो ओव्हररेटमुळे पहिल्या सामन्याला मुकला आहे. त्यामुळे कर्णधारपद सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. तसेच जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त असल्याने या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे मुंबईचा संघ पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या तुलनेत कमकुवत दिसणार आहे. असताना पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर मोठं आव्हान असणार आहे. चेन्नई सुपर किंग्सला टक्कर देण्यासाठी मुंबई इंडियन्स प्लेइंग ११ आणि इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा पुरेपूर फायदा घेईल.
मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि विल जॅक्स सुरुवात करतील. कारण या दोन्ही फलंदाजांकडे पॉवर प्लेमध्ये धावा करण्याची क्षमता आहे. दोन्ही फलंदाज चालले तर चेन्नई सुपर किंग्सचं कठीण होईल. तिसऱ्या क्रमांकावर युवा फलंदाज तिलक वर्माला येईल. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव फलंदाजीला येईल. हार्दिक पांड्या नसल्याने पाचव्या क्रमांकावर नमनधीर उतरण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्या नसल्याने त्याची जागा कॉर्बिन बॉशच्या माध्यमातून भरून काढली जाईल. तर विकेटकीपिंगची जबाबदारी रॉबिन मिंजच्या खांद्यावर असेल. तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल.
बुमराह आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहरच्या खांद्यावर असेल. तर अर्जुन तेंडुलकरलाही संधी दिली जाऊ शकते. अर्जुन तेंडुलकर गोलंदाजी आणि फलंदाजीही करतो. फिरकीची जबाबदारी मिचेल सँटनर आणि करण शर्माच्या खांद्यावर असेल.
अशी असू शकते मुंबई इंडियन्सची प्लेइंग ११
रोहित शर्मा, विल जॅक्स, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नमन धीर, रॉबिन मिंज (विकेटकीपर), कॉर्बिन बॉश, मिचेल सँटनर, दीपक चाहर, अर्जुन तेंडुलकर, ट्रेंट बोल्ट.