चेन्नई सुपर किंग्स विरूद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार खेळणार की नाही? आरसीबीने संकेत दिले की..
आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयाने सुरुवात केली. पण या सामन्यात भुवनेश्वर कुमारला प्लेइंग 11 मध्ये स्थान न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत होतं. आता आरसीबीचा दुसरा सामना 28 मार्चला चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. या सामन्यात भुवनेश्वर कुमार खेळणार की नाही? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा सर्वात कमनशिबी संघ ठरला आहे. पहिल्या पर्वापासून जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून हा संघ खेळत आहे. मात्र वारंवार पदरी निराशा पडत आहे. यंदाही असंच स्वप्न घेऊन संघ खेळत आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून या स्पर्धेत सकारात्मक सुरुवात केली आहे. असं असताना पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला संधी न देण्याचं कारण काय? असा प्रश्न अनेकांनी विचारला. त्यात चेन्नई सुपर किंग्ससारख्या तगड्या संघाविरुद्ध मैदानात उतरणार का? असा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पुनरागमन करण्यास सज्ज आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार खेळण्याची शक्यता आहे. आरसीबीने अधिकृत सोशल मीडियाद्वारे भुवनेश्वरच्या पुनरागमनाबद्दल जोरदार संकेत दिले आहेत. फ्रँचायझीने भुवनेश्वर कुमारचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले, “भुवी पूर्वीपेक्षा अधिक जलद आणि धाडसी पद्धतीने परतत आहे!”
भुवनेश्वरच्या पुनरागमनामुळे आरसीबीच्या गोलंदाजीला अतिरिक्त बळ मिळेल यात काही शंका नाही. पॉवरप्लेमध्ये त्याची विकेट घेण्याची क्षमता, अनुभव आणि डेथ ओव्हर्स गोलंदाजी करण्याची ताकद आहे. आरसीबीसाठी हा एक मोठा खेळाडू आहे. विशेषतः सीएसकेसारख्या मजबूत फलंदाजी लाइनअपचा सामना करताना अनुभवी गोलंदाजाची गरज आहे. भुवनेश्वर कुमार हा आयपीएलमध्ये प्रचंड अनुभव असलेला वेगवान गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 176 सामने खेळले आहेत आणि 7.56 च्या इकॉनॉमी रेटने 181 विकेट्स घेतल्या आहेत.
Bhuvi will be swinging back into action sooner and bolder than ever! 💫 #PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 pic.twitter.com/0Mf6VWzdap
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 24, 2025
भुवनेश्वरच्या गैरहजेरीत जम्मू आणि काश्मीरचा तरुण वेगवान गोलंदाज रसिक सलामला खेळण्याची संधी मिळाली. त्याने तीन षटकांत 35 धावा देऊन सुनील नरीनचा महत्त्वाचा बळी घेऊन यश मिळवले. जोश हेझलवूडने चार षटकांत 22 धावा देत 2 बळी घेत आपली प्रतिभा दाखवली. यश दयालने तीन षटकांत 25 धावा दिल्या आणि स्लॉग षटकांत एक विकेट घेतली. या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सला 174 धावांपर्यंत रोखलं. आरसीबीने हे लक्ष्य फक्त 16.2 षटकांत पूर्ण केले आणि सहज विजय मिळवला.